करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव श्री येथील बेकायदा वाळू उपशाची तक्रार केल्यानंतर प्रशासनाने पंचनामा केला आहे. त्याचा अहवाल तहसील कार्यालयात देण्यात आला आहे. आता प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव हे नेमकी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
बिटरगाव श्री येथे सीना नदीतून बेकायदा वाळू उपसा केल्याप्रकरणी माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब मुरूमकर यांनी तक्रार केली होती. त्यानंतर तत्काळ याचा पंचनामा करण्यात आला आहे. तलाठी विवेक कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पंचनामा झाला आहे. याची गंभीर दाखल प्रशासनाने घेतली असून संबंधितावर कारवाई केली जाईल, असे प्रभारी तहसीलदार जाधव यांनी सांगितले होते. त्यानंतर आता पंचनाम्याचा अहवाल तहसील कार्यालयाकडे देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यावर आता काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे. वाळू उपशाला गावातीलच काहीजण सहकार्य करत असल्याची चर्चा असून राजकीय द्वेषातून हा पंचनामा झाल्याची चर्चा आहे.