माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या निवासस्थानी पोलिसांकडून ‘सर्चिंग’

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या निवासस्थानी रात्री पोलिसांकडून ‘सर्चिंग’ झाले आहे. त्यांचे चिरंजीव करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप यांच्यावर शासकीय कामात अढथळा आणल्याप्रकरणी करमाळा पोलिसात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये त्यांना अटक करण्यासाठी हे सर्चिंग केले असल्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा होता त्यामुळे करमाळा शहरात सकाळपासून विविध चर्चा सुरु आहेत. त्यावर गुघे यांनी ही माहिती दिली आहे.

जगताप यांच्यावर २९ मार्चला बोरगाव येथे बेकायदा वाळू उपशाप्रकरणी कारवाई सुरु असताना शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा कसा बेकायदा आहे याची माहिती जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. जगताप यांच्यासह अक्षय विठ्ठल शिंदे, गणेश गायकवाड, विशाल शिंदे यांच्यासह इतर चार- पाचजणांवर हा गुन्हा दाखल आहे. काल (शुक्रवारी) रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलिस त्यांना अटक करण्यासाठी निवासस्थानी गेले होते. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत पोलिस तेथे होते. याची माहिती करमाळा शहरात झाली असून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

याबाबत पोलिस निरीक्षक घुगे म्हणाले, ‘जगताप यांच्यावर गुन्हा दाखल असून कायदेशीररित्या त्यांना अटक करण्यासाठी पोलिस गेले होते. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. यासाठी सोलापूर येथील एलसीबीचे पथक देखील आले होते. कायदा सर्वांना सारखा आहे. त्याचे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *