करमाळा (अशोक मुरूमकर) : पुणे पदवीधर मतदारसंघात मतनोंदणीसाठी विशेष मोहीम राबवली जात असून याची जनजागृती करण्यासाठी करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात पोलिस पाटील यांची बैठक घेण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविकाही उपस्थित होत्या. उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड यांनी प्रत्येक गावातील पदवीधर व्यक्तींना मतदानासाठी नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी, महसुलचे नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, निवासी नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे आदी उपस्थित होते. ‘पदवीधर मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी गटनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. तालुक्यात आतापर्यंत पदवीधरचे ६१९ व २८५ शिक्षक मतदार नोंदणी झाली आहे. मतदार नोंदणीसाठी सर्व मदत केली जात आहे. पदवीधर नागरिकांनी जास्तीतजास्त नोंदणी करावी’, असे आवाहन निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार सादिक काझी यांनी केले.

 
		 
		 
		