सोलापूर (अशोक मुरूमकर) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत काल (मंगळवारी) भाजपचे सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी १९ मिनिटांच्या भाषणात सोलापूरसह देशातील प्रश्नांवर भाष्य करत नरसय्या आडम यांच्यासह शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या योजनांवरही त्यांनी भाष्य करत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पुन्हा एखादा बँक कर्जाचे आश्वासन देत तरुणांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

श्री छत्रपती संभाजी महाराज चौकातून भाजपचा विकास संकल्प रथ निघाला. या रथाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी, लहुजी सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, आरपीआय (ए) व रयत क्रांतीचा झेंडा होता. आमदार बबनदादा शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल, शंभूराजे जगताप, गणेश चिवटे, महेश चिवटे व जगदीश अग्रवाल आदी उपस्थित होते.

‘ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध राहुल गांधी अशी आहे. देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे,’ असे म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात केली. ही निवडणूक भाजपसाठी किती महत्वाची आहे हे सांगण्याचा त्यांनी यामधून प्रयत्न केला. मोदी हे आमच्या विकासाच्या गाडीचे इंजिन असल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. हे इंजिन पावर फुल असून यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जागा असल्याचे सांगितले. विरोधकांच्या गाडीला मात्र राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे. मात्र इंजिन नाही तर फक्त डबे आहेत. यामध्ये सर्वसामान्यनाना बसण्यासाठी जागा नाही. त्यांच्या इंजिनमध्ये ड्रायव्हर नाही तर संपूर्ण परिवार बसत आहे, असे म्हणत त्यांनी घराणेशाहीवर टीका केली आहे. ‘हे इंजिन तुम्हाला दिले तर त्यात तुम्हाला बसू देणार नाहीत तर प्रणिती शिंदे यांनाच बसवतील’, असे म्हणत त्यांनी शिंदेंवर टीका केली आहे. ही निवडणूक साधी नसून तुम्ही विकासासाठी मोदींच्या उमेदवारांना विजयी करा. तुम्ही कमळाला मत दिले तर मोदींना मतदान होईल मात्र विरोधी गटाला मतदान केले तर राहुल गांधींना मत जाईल, मग तुम्ही कोणाला मत देणार असा प्रश्न करत फडणवीस यांनी वातावरण निर्मिती केली.

१० वर्षात मोदींनी केलेल्या कामाचाही आलेख फडणवीस यांनी उपस्थितांपुढे मांडला. ‘सोलापूरमध्ये काही लोक काँग्रेसला समर्थन देत आहेत. मात्र तुम्ही आमच्याकडे आला तेव्हा आम्ही तुम्ही कोणत्या पक्षाचे हे पाहिले नाही. ३० हजार घरांचा प्रकल्प आम्ही दिली. आता तुम्ही कोणालाही समर्थन दिले तरी सर्वसामान्य नागरिक आमच्याबरोबर आहे’, असे म्हणत त्यांनी नरसय्या आडम यांच्यावर फडणवीस यांनी नाव न घेता निशाणा साधला.

काँग्रेसपेक्षा भाजपने इन्फास्ट्रक्चरवर भर दिला. भाजपने भष्टाचार संपवला असून भष्टाचार करणाऱ्याला जेलमध्ये टाकून नागरिकांचा पैसा नागरिकांसाठीच वापरला आहे, असे म्हणत काँग्रेसवरही टीका केली आहे. सोलापूर व सातारा जिल्ह्यात पाणी योजना झाल्या नाहीत. ४० वर्ष सत्तेत राहूनही ज्यांनी जिल्ह्याचे नेतृत्व केले ते काम होऊ शकले नाही. मात्र आम्ही ते काम करून दाखवेल असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यांचे नाव न घेता निशाणा साधला. मोठे- मोठे नेते एकत्र येतात त्यांना प्रश्न विचारा असेही फडणवीस म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वीच मोहिते पाटील व पवार व शिंदे एकत्र आले होते. त्यामुळे फडणवीस यांनी केलेले हे विधान महत्वाचे मानले जात आहे. गणपतराव देशमुख यांनी पाण्यासाठी संघर्ष केला मात्र काँग्रेसच्या काळात पाणी योजना पूर्ण होऊ शकली नाही. भाजपने पाणी प्रश्न मार्गी लावले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.

‘राम सातपुते हे गरिबीतून तयार झालेले नेतृत्व आहे. त्यांनी खूप संघर्ष केला आहे. सोन्याचा चमचा घेऊन तो आलेला नाही. मात्र आज काही लोक त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत’, असे म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेल्या टीकेला फडणवीस यांनी भावनिकपणे उत्तर दिले आहे. रामभाऊने पैसा नाही पण प्रेम कमावले असे ते म्हणाले आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *