करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात एका कंपनीच्या नावाने बनावट रंग विक्री करत असल्याच्या संशयाने एका दुकानावर दिल्लीतील पथकाच्या मदतीने करमाळा पोलिसांनी धाड टाकली आहे. यातील बनावट रंगही ताब्यात घेण्यात आला आहे. आज (मंगळवारी) दुपारी ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. संबंधित कारवाईवेळी पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे हे स्वतः घटनास्थळी हजर होते, असे समजत आहे.
घरासाठी वापरण्यात येणाऱ्या एका कंपनीचा बनावट रंग करमाळ्यात विक्री केला जात असल्याची माहिती संबंधित कंपनीला मिळाली होती. करमाळा शहरातील फुलसुंदर चौकात हे दुकान आहे. संबंधित कंपनीचे मुख्यालय हे मुंबई आहे. संबंधित रंगाची तक्रार आल्यानंतर दिल्ली येथील पाच जणांच्या पथकाने याची शहानिशा केला. तेव्हा संबंधित रंग हा बनावट असल्याचे निदर्शनास आले, असे या पथकातील प्रमुख आनंद प्रसाद यांनी सांगितले.
संबंधित कंपनीचा रंग आणि दुकानातील रंग यामध्ये फरक असल्याचे प्रसाद यांनी ‘काय सांगता; न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक गुंजवटे यांनी सांगितले आहे. मात्र या कारवाईमुळे रंग विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण असून यामधील नेमका सूत्रधार कोण असेल याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.