करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत तसेच इच्छुकांकडूनही जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी लढत राज्यात होणार आहे. पण उमेदवारीवरून मात्र सध्या चर्चा रंगताना दिसत असून करमाळ्यात आमदार संजयमामा शिंदे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे भाजपकडून बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व शिवसेनेकडून (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे इच्छुक असून त्यांची तशी तयारीही सुरु आहेत. त्यात आमदार शिंदे यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे प्रमुख पक्ष आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (ठाकरे गट) हे प्रमुख पक्ष आहेत. या निवडणुकीत ज्याचा आमदार त्याला उमेदवारी असे महायुतीचे धोरण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोल्हापूर येथील कागल मतदारसंघात अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे समरजित घाटगे हे ‘तुतारी’ हाती घेणार आहेत.
इंदापूरमधील स्थिती…
इंदापूरमध्येही तसंच चित्र असून येथे आमदार दत्तात्रय भरणे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या उमेदवारीमुळे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी अद्याप निर्णय जाहीर केला नसला तरी भरणे यांना महायुतीतून उमेदवारी गेली तर हर्षवर्धन पाटील हे काय करतील हे पहावे लागणार आहे.
करमाळ्यातील परिस्थिती…
करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार संजयमामा शिंदे हे अपक्ष विजयी झालेले आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ते नेते मानतात. आणि सरकारमध्ये त्यांचा सहभागही आहे. त्यांना महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल असे बोलले जात आहे. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांनी पुन्हा अपक्ष निवडणुकीत उतरावे अशी मागणी आहे. त्यात काही दिवसांपूर्वी करमाळ्यातील [प्रमुख असलेल्या बागल गटाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. बागल गट पुन्हा निवडणुकीत उतरणार हे जवळजवळ निश्चित असून भाजपकडून बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे. बागल यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर आमदार शिंदे यांची भूमिका काय असेल हे पहावे लागणार आहे. महायुतीत शिवसेनेकडून (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे हे देखील इच्छुक आहेत. त्यांची तशी तयारी सुरु आहे. त्यात आमदार शिंदे यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. कार्यकत्यांची मागणी मात्र आमदार शिंदे यांनी अपक्ष निवडणुकीत उतरण्याची आहे.
कागलमधील परिस्थिती…
कागल विधानसभा मतदारसंघात समरजित घाटगे हे भाजपचे नेते आहेत. येथे हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जाईल हे निश्चित आहे. त्यामुळे भाजपचे नेते समरजित घाटगे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. कागल येथे त्यांचा हा प्रवेश होणार आहे. महायुतीकडून कागल विधानसभा मतदारसंघासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे अपक्ष लढण्यापेक्षा महाविकास आघाडीकडून (शरद पवार यांच्या राष्ट्रवादी) लढण्याचे ठरवून त्यांनी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ सप्टेंबरला त्यांचा प्रवेश होणार आहे. गेल्या निवडणुकीत ते अपक्ष निवडणुकीत होते.