With the Bazar Committee unopposed the Patil group focus is only on the Legislative AssemblyWith the Bazar Committee unopposed the Patil group focus is only on the Legislative Assembly

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली यात पाटील गटाचा नेमका काय फायदा झाला? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. बाजार समिती निवडणुकीमध्ये अनेकदा वाद झालेले आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये जगताप गटाची सत्ता उलथून लावण्यात विरोधी गटाला यश आले. राजकीय समीकरणे बदलली. गेल्यावर्षी जो संघर्ष निर्माण झाला त्यावर यावर्षीची निवडणूक बिनविरोध करून पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. हा यशस्वी प्रयत्न होत असतानाच प्रत्येक गटाचे वेगवेगळे हेतू आहेत? अशी चर्चा असून कोणता गट कसा फायदा करून घेईल हे पहावे लागणार आहे.

करमाळा बाजार समिती निवडणूक बिनविरोध होताना पाटील गटाने दोन जागांवर समाधान मानले. मोहिते पाटील यांच्या समक्षच बागल, जगताप व पाटील यांच्यात समझोता झाला होता. त्यांच्या बैठकीतच जागा वाटपाचाही फॉर्म्युला ठरला होता. तालुक्यात दोन नंबरचा गट असतानाही पाटील दोन जागा घेत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा मार्ग मोकळा केला. पाटील गटाने सुरुवातीलाच त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. ‘पाटील गटाची स्पर्धा आमदार संजयमामा शिंदे यांचेशी असून इतर गटाबरोबर टोकाचे मतभेद नाहीत,’ असे सांगत शिंदे गटाच्या विरोधात एकत्र येण्याचे हे संकेत दिले होते. आणि त्यासाठी तडजोड करण्याची तयारी असल्याचे यावरून स्पष्ट होत होते. म्हणजे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. पण ही निवडणूक बिनविरोध झाल्याने काय फायदा होणार आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. माजी आमदार पाटील हे मोहिते पाटील समर्थक आहेत. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी सुरुवातीला पाठींबा दिला होता. त्यांच्या कामामुळे ‘रोडकिंग’, ‘पाणीदार आमदार’ म्हणून त्यांचा कार्यकर्ते उल्लेख करतात. त्यांना आमदार करण्यासाठी सर्वस्तरातून कार्यकर्ते प्रयत्न करतात. त्यातीलच हा एक प्रयत्न आहे. याचा कसा फायदा होणार हे आताच निश्चित नसले तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र अंदाज लावले जात आहेत.

पाटील गटाचे ‘हे’ फायदे होणार?
१) माजी आमदार नारायण पाटील यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या काही मताने विजय हुकला आहे. ही आमदारकी पाटील यांना पुन्हा मिळवायची आहे. त्यासाठी काही तडजोडी कराव्या लागणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून विरोधी गटात म्हणजे शिंदे गटात तालुक्यातून होत असलेले प्रवेश रोखणे हे आव्हान असल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत तालुक्यातील एक मोठा गट पाटील गटाबरोबर येणे आवश्यक आहे. या बाजार समिती निवडणुकीत भविष्यातील काही बोलणी झालेली नसली तरी काही शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या आहेत. त्याचा कसा फायदा होतो हे पहावे लागणार आहे. आणि यापुढे त्यासाठीच पाटील गटाकडून काम केले जाऊ शकते.
बाजार समिती बिनविरोध झाल्याने शिंदे गटाला ‘या’ पाच कारणांचा होणार फायदा?

२) गेल्या बाजार समिती निवडणुकीवेळी पाटील गटातून प्रा. शिवाजी बंडगर यांनी बंडखोरी करत ऐनवेळी बागल गटात जाऊन सभापतीपद मिळवले होते. मात्र माजी आमदार पाटील यांच्या आदेशाशिवाय प्रा. बंडगर पाटील गटातून बाहेर पडू शकत नाहीत अशी चर्चा तेव्हा होती. जगताप गटाला या निर्णयामुळे बाजार समिती सोडावी लागली होती. हा राग जगताप गटात होता. मात्र आता पाटील गटाने या निवडणुकीत ताकद जास्त असतानाही फक्त दोन जागेवर समाधान मानून जगताप यांना बाजार समिती बिनविरोध दिली. त्यामुळे जगताप यांचा राग कमी होऊन भविष्यात याची परतफेड होऊ शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

३) येत्या विधानसभा निवडणुकीत काहीही करायचे पण आमदार शिंदे यांना रोखायचे याची तयारी पाटील गटाकडून सुरु आहे. त्याचे अनेक संकेत आहेत. शिंदे गटातील काही कार्यकर्ते पुन्हा पाटील गटातही घेतले जात आहेत. साडेचे दत्तात्रय जाधव हे एक त्याचेच उदाहरण आहे. भविष्यात जगताप गट पाटील गटाबरोबर नाही आला तरी चालेल पण त्यांनी शिंदेंबरोबर राहू नये. ही निवडणूक बिनविरोध करून जगताप यांना पाटील गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. किंवा जगताप यांनी स्वतंत्र उरण्याचा निर्णय घेतला तरी पाटील गटाचा फायदा होऊ शकतो. पुढील समीकरणे कशी होणार हे पहावे लागणार आहे.

४) बागल गटाने विधानसभेला पाटील गटाला पाठींबा द्यावा, असाही प्रयत्न केला जात आहे. गेल्यावर्षी आदिनाथ कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत माजी आमदार नारायण पाटील यांनी जाहीरपणे रश्मी बागल यांना याबाबत विचारणा केली होती. मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनाथ सुरु करण्यासाठी बागल आणि पाटील एकत्र आलेही होते. मात्र बागल यांना तेव्हा ‘असे’ काय ठरलेच (‘काय सांगता’च्या युट्युबवर याचा व्हिडीओ उपलब्ध आहे.) नाही असे सांगितले होते. मात्र आता बागल बरोबर आले नाही तरी जगताप यांचाही पर्याय असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. या निवडणुकीत पाटील आणि बागल एकत्र लढतील, अशीही चर्चा होती. त्याला सकारात्मक वातावरणही होते. मात्र ही निवडणूक झाल्याने पुढच्या राजकारणात बागल व पाटीलही एकत्र येऊ शकतात असा संदेश जाणार आहे. याचा फायदा भविष्यात होणार आहे.
Karmala APMC election युतीचे संकेत! पाटील गटाकडून बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर; आता भूमिकेकडे लक्ष

५) बागल गटाच्या ताब्यात असलेला मकाई सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावा यासाठी पाटील देखील स्वतः प्रयत्न करत होते. मोहिते पाटील समर्थक सवितादेवी राजेभोसले यांच्या समर्थकांनी निवडुकीतून अर्ज मागे घ्यावेत यासाठी पाटील स्वतः प्रयत्न करत होते. बागल आणि पाटील यांच्यातही यापूर्वी संघर्ष झालेला होता. तो संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न पाटील गटाकडून केला जात आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीत बागल यांचाही राग कमी करण्यासाठी मदत होणार आहे. मात्र येणाऱ्या काळात कशी समीकरणे बदलतील हे सांगता येणार नाही. बागल हे देखील विधानसभा निवडणुक लढवणारच आहेत. ते निवडणूक लढवण्यार ठाम आहेत, हे अनेकदा त्यांनी बोलूनही दाखवले आहे. आणि त्यांचे तसे प्रयत्नही सुरु असल्याचे कार्यकर्ते सांगतात. (बागल व जगताप गटाचे फायदे पुढच्या भागात)

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *