करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात सीना नदीवर संगोबा, पोटेगाव, तरटगाव व खडकी येथे कोल्हापूर पद्धतीचे लघु पाठबंधारे आहेत. या बंधाऱ्यातील पाण्यावर या भागातील शेती अवलंबून आहे. बंधारा पूर्ण क्षमतेने भरला तर साधणार मार्च- एप्रिलपर्यंत शेतीला पाणी पुरते. त्यामुळे आता पाऊस लांबल्याने नियमांच्या बाहेर जाऊन या बंधाऱ्यांची दारे टाकण्याची गरज आहे.
पोटेगाव बंधारा फक्त नावाला आहे. त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या बंधाऱ्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी पाठपुरावा करून ४ कोटी मंजूर केले. हे काम उन्हाळ्यात होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या सीना नदीत पाणी आहे. संगोबा येथील बंधाऱ्याची दारे टाकली तर तरटगाव बंधाऱ्यापर्यंत पाणी जाते. आणि आता दुरुस्तीपेक्षा शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे.
यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस पडला. त्यामुळे जुलैमध्येच सीना वाहिली. आता पाऊस लांबल्याने पाण्याचा प्रवाह कमी होत आहे. सरकार नियमानुसार बंधाऱ्यांची दारे टाकण्यासाठी आणखी कालावधी आहे. मात्र तोपर्यंत पाणी वाहून जाईल आणि बंधारे अपूर्ण राहतील, अशी भीती आहे. याकडे गांभीर्याने पाहून शेतकरी हीत लक्षात घेऊन नियमांच्या बाहेर जाऊन बंधाऱ्याची दारे टाकून पाणी अडवण्याची गरज आहे.
संगोबा, तरटगाव व खडकी या बंधाऱ्यांची दारे टाकली आणि पूर्ण क्षमतेने पाणी बसले तर खडकी, जवळा (जामखेड), पाडळी, आळजापूर, तरटगाव, बिटरगाव श्री, निलज, पोथरे, बाळेवाडी, पोटेगाव, बोरगाव या गावांना फायदा होतो. आमदार संजयमामा शिंदे यांनी यामध्ये लक्ष घालून बंधाऱ्याची दारे टाकण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन स्वतःदारे टाकली होती.