कोर्टीतील नागरिकांना तत्काळ मदत द्या; तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची शिंदेंची मागणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोर्टी येथील ओढ्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित रोख स्वरूपात मदत देण्याची गरज आहे. इतर ठिकाणी पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यासाठी सरकारकडे मागणी केली आहे, असे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.

करमाळा तालुक्यात सोमवारी (ता. १५) अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस कोर्टी व केत्तूर महसुली मंडळात झाला आहे. कमी वेळेत जास्त पाऊस झाल्यामुळे या भागात जनजीवनावर काहीकाळ परिणाम झाला. प्रशासनाने घटनास्थळाला भेटी देऊन नागरिकांना दिलासा दिला आहे. कोर्टी येथे घर, दुकाने, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय व पोस्ट कार्यालयामध्ये पाणी शिरले. त्यामुळे येथील नागरिकांना तत्काळ मदत करण्याची गरज आहे. इतर ठिकाणीही नुकसान झालेले असून त्याचे पंचनामे करून भरपाई द्यावी, असे माजी आमदार शिंदे यांनी म्हटले आहे.

करमाळा तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस कोसळला. सकाळी साधणार साडेनऊ वाजेपर्यंत हा पाऊस सुरु होता. कोर्टी येथील पुलावर पाणी आल्याने येथील वाहतूक बंद पडली होती. गावामध्येही ओढ्याचे पाणी शिरले होते. पाणी ओसरल्यानंतर येथील वाहतूक सुरु झाली आहे. काही घरांमध्येही पाणी शिरल्याचे नागरिक सांगत आहेत. तहसीलदार ठोकडे यांनी या गावाला तत्काळ भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. पोन्धवडी येथेही ओढ्याचे पाणी पुलावर आल्याने वाहतूक बंद झाली. तालुक्यात सरासरी ६१. ३० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. हिसरे येथील पुलावरून दुपारी ३ वाजेपर्यंत वाहतूक सुरु झालेली नव्हती, असे शिवसेनेचे शंभूराजे फरतडे यांनी ‘काय सांगता’शी बोलताना सांगितले.

करमाळा तालुक्यातील करमाळा मंडळात ३०.८०, अर्जुननगर मंडळात ३०.८०, केम मंडळात ७२.५०, जेऊर मंडळात ६७.८०, सालसे मंडळात ६७.३०, कोर्टी मंडळात ७६.८०, उमरड मंडळात ६७.८० तर केत्तूर मंडळात ७६.८० मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे किती नुकसान झाले याची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *