करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीला आलेल्या पुरामुळे करमाळा तालुक्यातील सीना नदी काटावरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
करमाळा तालुक्यात खडकी व बिटरगाव श्री येथे पालकमंत्री गोरे यांनी नुकसानीची पहाणी केली. तेव्हा वारे यांनी पालकमंत्री गोरे यांना निवेदन दिले आहे. सीना नदीला पुर आल्यापासून वारे यांनी गावागावात भेटी देऊन नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले. खडकी बंधारा फुटला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. करमाळा तालुक्यातील खडकी, आळजापूर, बिटरगाव श्री, पोथरे, निलज, करंजे, बोरगाव, पोटेगाव, बाळेवाडी, तरटगाव आदी गावांना सीना नदीच्या पुराचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना त्वरित मदत देण्याची गरज आहे, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे वारे यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सचिन नलवडे उपस्थित होते.