करमाळा (सोलापूर) : कुकडीचे रब्बी आवर्तन मंगळवारपासून (ता. २५) मिळणार आहे, अशी माहिती आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे. आमदार पाटील म्हणाले, ‘कुकडी पाणी वाटप कालवा सल्लागार समितीची बैठक अहिल्याबाईनगर येथे झाली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी कुकडीच्या माध्यमातून पाणी आवर्तन मिळावे, अशी मागणी केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच शेतीसाठी पाणी दिले जाणार आहे.
पाटील म्हणाले, ‘करमाळा तालुक्यातील पाणी मोजमाप करताना ते प्रत्यक्षात या तालुक्यातील कुकडी लाभ क्षेत्रात पाणी येण्यापूर्वी गृहीत धरले जाते व यामूळे अगोदर पाणी गळतीमुळे मिळत असलेल्या कमी पाण्याचे वाटप कमी दिवसात करणे अवघड होऊन जाते ही बाब जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर मांडली. करमाळा तालुक्यातील हद्दीत कुकडी किमी २२३ मध्ये पाणी प्रवेश केल्यानंतरच तेथील पाणी हिशोब अथवा प्राप्त पाणी मोजमाप धरले जावे असे आदेश दिले. कुकडी आवर्तनात करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अनेक दशकांपासून होणारा हा अन्याय आपण ठासून बाजू मांडल्याने आता दुर झाला असून यामुळे निश्चितच मिळणाऱ्या पाण्यात काही प्रमाणात का होईना वाढ होणार आहे.’