करमाळा (सोलापूर) : येथील कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयमधील राम सरडे या विद्यार्थ्याने शालेय विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. राज्य सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी व सोलापूर जिल्हा क्रीडा परिषदच्या वतीने शालेय विभागीय कुस्ती स्पर्धा भाळवणी (ता. पारनेर, जि. नगर) येथील श्री नागेश्वर मंगल कार्यालयात झाल्या.
पुणे विभागांतील सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक मिळवून विजयी झालेले कुस्ती खेळातील विविध खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचा खेळाडू सरडे याने 14 वर्षे वयोगट कुस्तीमध्ये करमाळा तालुक्यामधून प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. त्याबरोबर सोलापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धमध्ये त्याने जिल्हास्तरावर विजय प्राप्त करून त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. विद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक जितेश कांबळे यांनी त्याला मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल जाधव, उपमुख्याध्यापक भस्मे, पर्यवेक्षक अंकुशखाने यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सरडेचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.