प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न आहे. त्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री आवास योजना व अन्य घरकुल योजनांची कामे देशभरात वेगाने सुरु आहेत. यामध्ये बेघर व्यक्तींना लवकरात लवकर घर मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुल प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार २४ घरांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. हा गृह प्रकल्प देशातील सर्वात मोठा गृह प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते 9 जानेवारी 2019 रोजी झाले होते. या निमित्त…
सामान्यांच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)’ राबविण्यात येते. राज्य शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेच्या नागरी प्रकल्पांना गती देऊन, लाभार्थ्यांना विहीत मुदतीत घरे देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा ग्रामीण भागात मोठा लाभ नागरिकांना मिळत आहे. त्याच पद्धतीने शहरी भागातील नागरिकांना देखील अधिकाधिक लाभ मिळावा हा मुख्य हेतू या योजनेमागे आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील रे नगर येथे असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी हा प्रकल्प महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) राबवत आहे, त्याला केंद्र सरकारच्या पीएमएवायचे देखील सहाय्य आहे.
कामगारांचे शहर सोलापूर
कामगारांचे शहर, अशी सोलापूरची ओळख आहे. आधी सूतगिरणीमध्ये काम करणारे आता वस्त्रोद्योग, विडी उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रात हजारो कामगार सोलापुरात काम करतात. संपूर्ण आयुष्य झोपडपट्टीत घालवणाऱ्या या कामगारांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न या प्रकल्पातून साकार होताना दिसत आहे.