करमाळा (सोलापूर) : करमाळा योग समितीच्या वतीने 151 सूर्यनमस्कार केल्याबद्दल रेश्मा जाधव यांचा सत्कार करण्यात आला. अंबड (जि. जालना) येथे राज्यस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये करमाळा येथील 40 साधकांनी प्राचार्य बाळासाहेब नरारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेण्यात आला. यावेळी करमाळा येथील रेश्मा जाधव यांनी विशेष कामगिरी केल्याबद्दल कन्नडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर व आर्ट ऑफ लिविंगचे सीनियर टीचर फिरोज खान यांच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल आणि मॅट देण्यात आले. तसेच इतर सर्व साधकांना मेडल आणि प्रमाणपत्र देवानंद चित्राल यांच्यातर्फे देण्यात आले.
यावेळी प्राचार्य नरारे यांनी सर्व योगसाधकांना नियमित योगा करण्याबाबत मार्गदर्शन केले. तालुक्यातील प्रत्येक शाळेमध्ये योगा वर्ग सुरू करण्याचा मनोदय यावेळी त्यांनी व्यक्त केला. तरटगाव, मांगी, खडकी, जगदाळे वस्ती, सुळ वस्ती, धनगर वस्ती, कुंभेज येथील जिल्हा परिषद शाळा आणि नामदेवराव जगताप अध्याय विद्यालय करमाळा या ठिकाणी जिल्हा सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी ही माहिती त्यांनी दिली. प्रस्तावना दिगंबर पवार आणि सूत्रसंचालन निशांत खारगे यांनी तर आभार संतोष पोतदार यांनी मानले.