करमाळा (सोलापूर) : उजनी धरणात कुगाव ते कळशीदरम्यान वादळी वाऱ्याने उलटलेल्या बोटीत सहाजणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची मागणी बहुजन संघर्ष सेनेनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे केली आहे. याबाबत आज (शुक्रवारी) निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार माजिद काझी यांनी निवेदन स्वीकारले.
भीमा नदीमध्ये (उजनी धरण) झालेल्या दुर्घटनेत कुगाव येथील दोघे व झरे येथील पती- पत्नी व मुलगा- मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वादळी वाऱ्याने बोट उलटून हा अपघात झाला होता. याबरोबर रावगाव येथे वीज कोसळून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यालाही मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसाला प्रत्येकी सरकारने दहा लाख मदत करावी याबरोबर वादळात केळी बागा व इतर फळबागांचे नुकसान झाले असून याचे पंचनामे करून त्यांनाही त्वरित मदत करावी. वादळाने ज्या घरांची पडझड झाली व पत्रे उडून गेले त्याचेही पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यापुढे करमाळा तालुक्यातुन इंदापूरला जाण्यासाठी भीमा नदीमध्ये असलेल्या बोटींसाठी नियमावली घालून कायदेशीर परवानगी असल्याशिवाय प्रवासी वाहतूक करू देऊ नये ही सर्व जबाबदारी प्रशासनाची आहे. बेकायदा बोटीमधून प्रवाशांची वाहतूक होत होती याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले म्हणूनच कुगाव येथे बोट उलटण्याची दुर्घटना घडली, असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.
बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, रमेश भोसले, संतोष चव्हाण, राजेंद्र शितोळे, काका काकडे, अण्णासाहेब शिंदे, शेख आदी यावेळी उपस्थित होते.