सोलापूर : जिल्ह्यातील तहसील कार्यालयांनी निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेले मतदान कार्ड पोस्टाद्वारे अद्यापपर्यंत वाटप झालेले नाही, त्या सर्व तहसीलदारांनी त्वरित मतदान कार्ड वाटप करून अहवाल सादर करावा. एक ही मतदार मतदान कार्डपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूक पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, मंगळवेढा उपविभागीय अधिकारी अमित माळी, मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव, सांगोला तहसीलदार संतोष कणसे व निवडणूक नायब तहसीलदार प्रवीण घम व सुरेंद्र परदेशीमठ आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, प्रत्येक तालुक्यातील मतदारांमध्ये ईव्हीएम मशीन विषयी जनजागृती झाली पाहिजे या अनुषंगाने मोबाईल व्हॅन प्रत्येक गावात जाऊन योग्य पद्धतीने प्रबोधन करत आहेत का याविषयी संबंधित तहसीलदार यांनी नियंत्रण ठेवावे. ईव्हीएम मशीनची तपासणी करावी, त्यासाठी टीम तयार कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
सर्व तहसीलदार यांनी इपिक वितरण त्वरित करावे, सेक्टर ऑफिसर ची त्वरित नियुक्ती करावी, मास्टर ट्रेनर चे प्रत्येक तालुक्यातून पाच नावे कळवावीत, तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता तालुकास्तरावर करून ठेवावी, प्रत्येक मतदार केंद्रावर जाण्यासाठी व परत मशीन घेऊन येण्यासाठी रूट प्लॅन तयार ठेवावा, EVM मशीन साठी तालुक्याचे ठिकाणी स्ट्रॉंग रूम उपलब्ध करून ठेवावे. पोलिंग स्टॉप ची माहिती तात्काळ कळवावी, मटेरियल मॅनेजमेंट टीम ऍक्टिव्ह करावी, दिव्यांगाची यादी तयार करून ठेवावी, अशा मार्गदर्शक सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिल्या. तर मंगळवेढा व सांगोला तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती उपविभागीय अधिकारी अमित माळी यांनी दिली.