खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण! करमाळा तालुक्यात दुरुस्ती कधी होणार?

करमाळा तालुक्यात खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. हे खड्डे चुकवण्याच्या नादात सतत लहान मोठे अपघात होत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. काही दिवसात साखर कारखाने सुरु होत आहेत. त्यामुळे आणखी धोका वाढण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने खड्डे बुजवण्याचे काम त्वरित हाती घेणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांची आहे.

करमाळा तालुक्यात यावर्षी विक्रमी पाऊस झाला. दरवर्षी पावसाळ्यात काही ठिकाणी मुरूम टाकून तर काही ठिकाणी डांबर टाकून खड्डे बुजवले जात होते. मात्र यावर्षी काही ठिकाणी खड्डेच बुजवले नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. करमाळा जामखेड रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे आहेत. दुचाकीस्वरांसह वाहन चालकांना गाडी चालवताना अक्षरशः कसरत करावी. यामुळे गाडीचे तर नुकसान होत आहेच शिवाय लहान मोठे अपघातही होत आहेत. करमाळा बायपास रोडवर अनेकदा डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न झाला मात्र काम निकृष्ट झाल्याने खड्डे कायम राहिले आहेत. आवाटी ते कोर्टी रस्ता चांगला आहे. मात्र यावरील मोठमोठ्या गतिरोधकमुळे चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचेही काम सुरु होणे आवश्यक आहे. सतत खड्डे बुजवून अनेक ठिकाणी गाडी आदळते. त्यामुळे गाड्यांचे नुकसान होत आहे. याच मार्गावर खड्डे हुकवण्याच्या नादात एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गाडीचा झालेला अपघातही चर्चेत आला होता.

करमाळा जामखेड रस्त्यावर वाहतूक मोठी असून या रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. या मार्गावर खड्डेही जास्त आहेत. गेल्यावर्षी बुजवलेल्या खड्ड्यातील सर्व खडी व डांबर निघून गेले आहे. येथे वाहतूक जास्त आणि रस्ता अरुंद आहे. त्यात खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आता पावसाळा संपला असल्याने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *