करमाळा (सोलापूर) : बेकायदा वाळू वाहतुक करणाऱ्या चार चाकी टिपरला ताब्यात घेऊन करमाळा तहसील कार्यालयाकडे आणत असताना महसुल विभागाच्या पथकातील तलाठ्याला मारहाण करून टिपर चालक मध्येच वाळू खाली करुन टिपर घेऊन पळून गेला असल्याचा प्रकार २ जुलैला घडला आहे. याबाबत तलाठी विनोद भागवत जवणे (वय 39) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे.
तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा येथे बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या टिपरला पकडण्यासाठी तलाठ्यांचे एक पथक तैनात होते. रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास करमाळा- जामखेड रोडवरील गॅस एजन्सी परिसरात सबंधित टिपर बेकायदा वाळू घेऊन येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. तेथे हे पथक गेले तेव्हा पांढऱ्या रंगाचा एक टिपर तेथे आला. त्यामध्ये वाळू होती. याबाबत टीपर चालकाला पथकाने रॉयल्टीची विचारणा केली. तेव्हा त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची रॉयल्टी नव्हती.
पथकाने त्याला पंचनामा करून करमाळा तहसील कार्यालयाकडे टीपर घेण्यास सांगितले. त्या टिप्परमध्ये पथकातील तलाठी रामभाऊ खाडे हे बसले. त्यांच्या मागे पथकातील तलाठी बाळासाहेब अनबुले, यादव ठोंबरे यांच्यासह इतर काही तलाठी टिपरच्या मागे मोटारसायकलवर चालत होते.
करमाळा तहसीलकडे टिप्पर आणत असताना संबंधित चालकाने टिपर नालबंद मंगल कार्यालयाकडे घेतला. त्यानंतर टिपरमध्ये बसलेले तलाठी खाडे यांनी आपल्याला करमाळा तहसीलकडे टिप्पर घ्यायचा आहे, असे सांगितले. मात्र त्याने आपण बायपासने पोथरे नाका मार्गे जाऊ, असे सांगितले. तेव्हा टिपर स्मशानभूमीजवळ आल्यानंतर त्याने टिपर कच्च्या रस्त्याने भोसे रोडकडे घेतला.
भोसे रोडला टिपरमधील वाळू चालकाने खाली घेतली. तलाठी यांना मारहाण करून शिवीगाळ केली व गाडीतून खाली उतर, असे सांगितले. त्याने शासकीय कामात अडथळा व मारहाण प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे, याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदेश चंदनशिवे हे करत आहेत.