करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आमदार संजयमामा शिंदे हे पुन्हा रिंगणात उतरले आहेत. कंदरमध्ये शुक्रवारी (ता. २८) त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन होणार आहे. या विकास कामांमुळे कार्यकर्ते त्यांना चांदीची तलवार भेट देणार आहेत. या कार्यक्रमावेळी तालुक्यात सध्या सुरु झालेल्या दहिगाव उपसासिंचन योजनेवर ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बॅनर झळकले असून त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे फोटो आहेत.
माजी आमदार शिंदे यांचा निवडणुकीनंतरचा कंदर येथील पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. यापूर्वी ते जनता दरबारच्या निमित्ताने करमाळा कार्यालयात आले होते. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या भेटीगाठीही सुरु आहेत. आता त्यांचा जाहीर कार्यक्रम होत आहे. त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे कार्यकर्ते त्यांना चांदीची १ किलोची तलवार भेट देणार आहेत.
करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची समजली जाणारी दहिगाव उपसासिंचन योजनेवरून सध्या आमदार नारायण पाटील यांच्या गटाचे कार्यकर्ते व माजी आमदार शिंदे यांच्या गटाचे कार्यकर्ते यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यात माजी आमदार शिंदे यांचा होणार कार्यक्रम महत्वाचा मानला जात आहे. त्यात ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी आमदार शिंदे यांनी त्यांच्या काळात तालुक्यात विविध विकास कामे केली. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनसंपर्क कमी ठेवल्याचा आरोप झाला. आता शिंदे यांचा गावोगावी संपर्क सुरु झाला आहे. निवडणुकीनंतर आता जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांना भेटणार आहेत. कंदर येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमामुळे शिंदे समर्थकांमध्ये उत्साह असल्याचे दिसत आहे.