पुणे : दी पूना मर्चेंट्स चेंबरतर्फे व्यापार महर्षी उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा आदर्श व्यापारी पुरस्कार पुण्यातील सुप्रसिद्ध व्यापारी तथा पूरणचंद अॅन्ड सन्सचे संचालक सतीश गुप्ता यांना राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारते यावेळी सतीश गुप्ता यांच्यासह नंदलाल गुप्ता हेही उपस्थित होते.
जयराज स्पोर्ट्स अँड कन्वेन्शन सेंटर येथे संपन्न झालेल्या या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक प्रकाश धोका, दि पूना मर्चेंट्स चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, कार्यकारिणी सदस्य उत्तम बाठिया, राजेश शहा, वालचंद संचेती, जवाहर बोथरा, नवीन गोयल, प्रवीण चोरबेले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आनंद व्यक्त करीत सतीश गुप्ता म्हणाले की, कोणत्याही व्यवसायात ग्राहकांचा विश्वास जिंकणे महत्वाचे असते. २००९ पासून जेंव्हा मी व्यवसायात आलो तेंव्हापासून सातत्याने ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचाच आम्ही प्रयत्न केला. हेच आमच्या यशाचे गमक आहे. आज हा आदर्श व्यापारी पुरस्कार दिल्याबद्दल मी दि पूना मर्चेंट्स चेंबरचे मनापासून आभार व्यक्त करतो.
या कार्यक्रमात सतीश गुप्ता यांच्यासह वस्तीमल तखतमल संकलेचा, जिल्हास्तरीय पुरस्कार विजयकुमार मोतीलाल भन्साळी, तर पुणे शहरासाठी आनंद श्रवणकुमार पटेल, राजीव बाठिया, पत्रकार संजय ऐलवाड यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उत्तम बाठिया यांनी उपस्थितांचे आभार मानले.