करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातून दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन पथसंचलन सराव शिबिरासाठी रिया परदेशीची निवड झाली आहे. या सराव शिबिरासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिल्ली येथे होणाऱ्या महाराष्ट्र प्रजासत्ताक दिन पूर्व पथसंचलन शिबिरासाठी अंतिम निवड चाचणी करिता विद्यापीठाचा संघ विजयवाडा येथे रवाना झाला.
यासाठी विद्यापीठातून दोन स्वयंसेविका निवडण्यात आल्या. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची स्वयंसेविका रिया परदेशीची निवड झाली. विद्यापीठाचा संघ रवाना होताना निवड झालेल्या स्वयंसेवकांचा सत्कार विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रकाश महानवर यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यापीठाच्या कुलसचिव डाॅ .योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डाॅ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ. केदारनाथ काळवणे, विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक डाॅ. मलिक रोकडे, डाॅ. संजय मुजमुले, विभागीय समन्वयक पंढरपूर विभाग आदी उपस्थित होते.
या निवडीबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. एम. साळुंखे, कॅ. संभाजी किर्दाक यांनी स्वयंसेविका रिया परदेशी व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद शेटे यांचे अभिनंदन केले.