करमाळा (अशोक मुरूमकर) : महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रचार सभा व माजी आमदार नारायण पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी शरद पवार हे आज (शुक्रवारी) करमाळ्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान पवार यांनी अत्यंत चातुर्याने जबरदस्त राजकीय डाव टाकले आहेत. त्यांच्या तीन घटनांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. आदिनाथ कारखान्यावेळी पाटील यांनी घेतलेली भूमिका आणि त्याआधी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळत असतानाही पाटील यांनी थेटपणे उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे पवार हे पाटील यांना राष्ट्रवादीत घेणार नाहीत, अशी चर्चा होती. आमदार रोहित पवार यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्यावर आदिनाथवरून अनेकदा टीकाही केली होती. मात्र आता त्यांच्या उपस्थितीतच पवार यांनी पाटील यांना प्रवेश दिला आणि आदिनाथबाबत पाटील यांना मंत्री सावंत यांनी कसे चुकीचे काम करायला लावले हे सांगितले. यापूर्वी म्हणजे लास्ट टाईम गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पवार यांनी कढललेली ‘शिवस्वराज्य’ यात्रा बागल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे रद्द करावी लागली होती. तेव्हा शरद पवार यांना करमाळ्यात येता आले नव्हते. त्यानंतर आज पवार हे करमाळ्यात आले होते.
१) पवार यांनी दौऱ्यादरम्यान बाजार समितीच्या समोरील देशभक्त नामदेवराव जगताप यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तेव्हा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पवार यांचे स्वागत केले. जगताप हे महायुतीबरोबर आहेत. याच आठवड्यात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेवेळी त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर जगताप यांनी बाजार समिती येथे पवार यांचे स्वागत केले आहे. यावर अद्याप जगताप गटाने स्पष्टीकरण दिलेलं नसले तरी या भेटीची प्रचंड चर्चा रंगली असून मोहिते पाटील यांच्या मताधिक्यासाठी ही भेट महत्वाची मानली जात आहे.
२) पवार यांना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या निवासस्थानी भोजन ठेवण्यात आले होते. या भोजनावेळी अगदी निवडक व्यक्ती उपस्थित होत्या. त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, अभयसिंह जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व माजी आमदार नारायण पाटील यांचा समावेश होता. हे सर्व एकाच टेबलवर जेवण करायला बसले होते. तेव्हा माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, देवानंद बागल, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप, अरुणकाका जगताप, पत्रकार अशोक मुरूमकर हे उपस्थित होते. जेवण झाल्यानंतर पवार यांनी रिटेवाडी उपसासिंचन योजनेसाठी लढा उभारलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यानंतर वारे, माजी आमदार पाटील, बागल व पवार यांच्यात साधारण १५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी वारे यांनी स्वतः आम्हाला महत्वाचे बोलायचे असून इतरांना बाहेर थांबण्याची विनंती केली. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजलेला नाही. हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे.
३) पवार हे वारे यांच्या निवास्थान येथून थेट हेलिपॅडवर जातील, असे सर्वांना वाटले. मात्र ते थेट हेलिपॅडवर गेले नाहीत. त्यांचा कॅन्व्हा यशवंतराव चव्हण महाविद्यालया समोरून हेलिपॅडकडे आला नाही तर त्यातील समोरची पोलिसांची गाडी हेलिपॅडकडे आल्यांनतर पवार यांची गाडी सरळ पुढे गेली. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि बागल यांची भेट घेण्यासाठी पवार गेले की काय असा अंदाज वर्तवला जाऊ लागला. मात्र तेवढ्या पुन्हा गाडी वळण घेऊन हेलिपॅडवर आली. पवार यांच्या गाडी बागल यांच्या दारासमोरून वळण घेऊन आली, अशी चर्चा सुरु झाली. ती गाडी मराठा सेवा संघाची जागा पाहण्यासाठी गेली होती, असे सांगितले जात असले तरी बागल गटाला डिवचण्याचा तर हा प्रयत्न केला नाही ना? अशी चर्चा सुरु झाली. एकेकाळी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल या पवार यांच्या गाडीत हक्काने बसू शकत होत्या. मात्र बागल गटाने घेतलेली भूमिका राष्ट्रवादीला अडचणीत आणणारी ठरली होती. मात्र पाटील यांच्या रूपाने पुन्हा करमाळा तालुक्याला राष्ट्रवादीसाठी चांगला चेहरा मिळाला आहे.
शरद पवार यांनी करमाळ्यात आल्यानंतर जगतापांची भेट घेणे त्यानंतर तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या घरी जेवण करणे व त्यानंतर मराठा सेवा संघाची जागा पाहण्याच्या निमित्ताने बागलांच्या बंगल्यापुढे गाडी वळवणे ही राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे. राजकीय दृष्ट्या या घटना महत्वाच्या मानल्या जात असून याचा तालुक्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.