करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेलगाव (वां) ते ढोकरी या १४ किलोमीटरच्या रस्त्याची दुरुस्ती, डांबरीकरणाच्या कामाला आमदार संजयमामा शिंदे यांच्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. हे काम सुरू झाले असल्याची माहिती मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विवेक येवले यांनी दिली आहे.

येवले म्हणाले, अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था होती. त्यामुळे या परिसरातील गावांच्या वाहतुकीचा प्रश्न बिकट झाला होता. या भागातील कार्यकर्ते व नागरिकांनी ही बाब आमदार शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा करून हे काम शिंदे यांनी मंजूर करून घेतले. या संदर्भात अधीक्षक अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना पुणे, कार्यकारी अभियंता, सोलापूर यांना पत्राद्वारे पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता २ कोटी ६५ लाखाच्या कामास आता सुरुवात झाली आहे.

करमाळा तालुक्यातील रस्ते विकासासाठी जुलै २०२३ आणि डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केलेली आहे. येणाऱ्या अधिवेशनात रस्ते विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध होणार आहे. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये ऊस वाहतुकीमुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे जेऊर ते चिखलठाण या रस्त्यासाठीही 13 कोटीचा निधी मंजूर असून लवकरच ते काम सुरू होणार आहे. तसेच पश्चिम भागातील वांगी २, वांगी १ यांना जोडणारे रस्ते यांच्यासाठी ही आपण येणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणार आहोत, असे आमदार शिंदे यांनी सांगितले आहे.