Sanjay Shinde

विधानसभा निवडणुकीत संजयमामा शिंदे यांचा १६ हजार मताने पराभव झाला. येथील निवडणूक घासून होईल असे अंदाज होते हजार- दोन हजार मताच्या फरकाने कोणाचाही विजयी होईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता. मात्र सर्वांचे हे अंदाज खोटे ठरले. शिंदे यांनी तालुक्यात विकास केला त्याच जोरावर त्यांना ८० हजार मतं मिळाली. त्यांच्या पराभवाची कारणं वेगळी आहेत. आणि निकालानंतर शिंदे गटाबद्दलच राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. पण करमाळ्यात शिंदे गट सक्रिय होणार आणि पुन्हा भरारी घेणार असेही बोलले जात आहे.

२०१४ च्या करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात माजी आमदार संजयमामा शिंदे हे पहिल्यांदा उतरले. त्यात त्यांचा पराभव झाला होता. पुढे २०१९ ते विजयी झाले आणि २०२४ त्यांचा पराभव झाला. २०१४ मध्ये पराभव झाल्यानंतर ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरले आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यामाध्यमातून त्यांनी करमाळ्यात विकास कामे केली. २०१९ ला विधानसभेवर गेल्यानंतरही त्यांनी करमाळा मतदारसंघासाठी मोठ्याप्रमाणात निधी आणला. विकास कामांमुळे त्यांना मताधिक्यही मिळाले पण तरीही त्यांचा पराभव झाला. राजकीय डावपेचात शिंदे गट कमी पडला असे बोलले जात आहे.

२०१४ च्या निवडणुकीपासून करमाळ्यात शिंदे गट नावारूपाला आला. या गटात जगताप, बागल व पाटील गटातील नाराज कार्यकर्ते गेले. नवख्या कार्यकर्त्यांनाही येथे चांगली संधी मिळाली. त्यातून हा गट सक्षम बनत गेला. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चांगले वातावरण असतानाही त्यांना फटका बसला. माजी आमदार शिंदे यांनी गट वाढवण्याच्या दृष्टीने आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काम केले. निधी देताना तो आपला की विरोधक याचा कधीच विचार केला नाही. काही गावात तर विरोधकांचे काम झाल्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्ताला समजत होते. आमदार म्हणून काम करताना शिंदे यांनी कधीच राजकारण केले नाही. त्यामुळे जवळचे काही कार्यकर्तेही नाराज होत गेले. त्यांनी बोलून दाखवले नसले तरी ही खदखद खासगीत काहींनी बोलून दाखवली होती.

शिंदे यांनी विकास काम केले मात्र ‘ते करमाळ्यातील आहेत असं वाटलं नाही’. ‘आपला माणूस म्हणत’ विरोधकांनी सायलंटमध्ये प्रचार केला. शिंदे गटाचे कार्यकर्ते हा मुद्दा खोडू शकले नाहीत. विकास केला मात्र तेही उघडपणे गावागावात मांडू शकले नाहीत. शिंदेंनी कार्यकर्त्यांना पूर्ण बळ दिले मात्र त्यात कार्यकर्ते कमी पडले. शिंदे यांनी आणखी जनसंपर्क वाढवायला हवा होता. यापुढेही शिंदे यांनी जनसंपर्क वाढवणे आवश्यक आहे.

विकासाच्या मुद्द्यात शिंदे यांच्याबद्दल चांगले मत आहे. मात्र जनसंपर्क कमी असल्याचे बोलले जाऊ लागले. शिंदे फक्त शुक्रवारी करमाळ्यात असतात असे म्हणत विरोधकांनी निशाणा साधला. निवडणूक निकाल झाल्यापासून शिंदे गट पुढे कसं काम करेल याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. याला माजी आमदार शिंदे यांनी दोन नंबरच्या फळीत मजबूत कार्यकर्ते तयार करून उत्तर देणे आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे स्वतः जनसंपर्क ठेऊन प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन वास्तव जाणून घेणे आवश्यक आहे. काही कार्यकर्त्यांच्या भरवशावर न राहता स्वतः लक्ष घालून सक्रियपणे उतरणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी यांनीही स्वतः यामध्ये लक्ष ठेवून कार्यकर्त्यांना विश्वास देण्याची गरज आहे. शिंदे यांच्या गटात चंद्रकांत सरडे, सुहास गलांडे, विलास पाटील, राजेंद्र बारकुंड, चंद्रहास निमगिरे, अशोक पाटील, अॅड. नितीनराजे भोसले यांच्यासारखी ताकदवान मंडळी आहे. सुजित बागल, विवेक येवले, ॶॅड. अजित विघ्ने, डॉ. गोरख गुळवे, विलास राऊत, रवींद्र वळेकर, अजिंक्य पाटील आदींसारखी मंडळी पुन्हा सक्रिय करून कामाला लागणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर व चारचौघात विनाकारण गटाची बाजू मांडणाऱ्याला आवर घालणे आवश्यक आहे. गट वाढवण्याच्या दृष्टीने ज्या सकारात्मक बाबी आहेत त्यावर चर्चा करून कृती करणे आवश्यक आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *