कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी शिंदे आदिनाथच्या निवडणूक रिंगणात; पाटील यांचा शिंदेंवर आरोप

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे हे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उतरले आहेत’, असा आरोप आमदार नारायण पाटील यांनी केला आहे. ‘स्वतःचा कारखाना त्यांनी विकला आहे आणि आता आदिनाथच्या निवडणूक रिंगणात ते उतरेल आहेत. मात्र मतदारांनी योग्य विचार करून आमच्या पॅनलला संधी द्यावी’, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

श्री आदिनाथ संजीवनी पॅनलची कंदर येथे प्रचार सभा झाली. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. माजी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती आदिनाथ बचाव पॅनल तर आमदार पाटील यांच्या नेतृत्वखाली आदिनाथ संजीवनी पॅनल यांच्यात प्रमुख लढत होत आहे. प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली देखील तिसरा पॅनल आहे. यामध्ये माजी आमदार शिंदे व आमदार पाटील यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत.

आमदार पाटील म्हणाले, ‘आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभारणीत गोविंदबापू पाटील यांच्यासह इतर ज्येष्ठ मंडळींचा मोठा सहभाग आहे. गोविंदबापूचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला हा कारखाना ताब्यात हवा आहे. त्यासाठी कोणत्याही संकटात जाण्याची माझी तयारी आहे. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी दोनवेळा आमदार झालो आहे. माझ्या काळात मी अनेक विकासकामे केली आहेत. पूर्व व पश्चिम भागात मी रस्त्याचे काम केले आहे.’

पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, ‘आदिनाथ कारखाना व्यवस्थित चालला असता तर कामगारांचे प्रश्न सुटले असते. कारखाना हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. नाकर्तेपणामुळे आदिनाथ कारखाना अडचणीत आला आहे. शिंदे हे गेल्यावेळी आमदार होते. त्याच्या काळात कोणती ठोस कामे झाली? असा प्रश्न त्यांनी केला.

‘माजी आमदार शिंदे यांनी दुसऱ्यांच्या पैशावर कारखाना उभा केला. अनेक शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढली. अनेक शेतकऱ्यांचे त्यांच्यामुळे सीबील खराब झाले’, असा आरोप पाटील यांनी शिंदे यांच्यावर केला. ‘स्वतःचा कारखाना विकून शिंदे येथे येऊन काय करणार आहेत. कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी ते या निवडणुकीत उतरले आहेत’, असा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे. ‘आपल्या तालुक्यात कार्यकर्त्यांची कमी नाही. त्यांनी येथे येऊन राजकारण करण्याची गरज नाही. त्यांनी काय चांगले काम केले आहे? येथे बागल, जगताप व आमचे घराणे राजकारणात आहे. येथील कार्यकर्त्यांना संधी द्या,’ असे आवाहन देखील आमदार पाटील यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *