करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या सोलापूर- मुंबई मार्गावरील जेऊर स्थानकावर ‘हुतात्मा व उद्यान एक्सप्रेस’ या गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी जेऊर प्रवाशी संघटनाचे अध्यक्ष सुहास सुर्यवंशी व उपाध्यक्ष प्रवीण करे यांनी मध्य रेल्वे सोलापूरचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार डोहारे यांच्याकडे करण्यात आली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, कोरोना काळामध्ये बंद केलेली मुंबई विजापूर फास्ट पॅसेंजर (51029- 51030) बंद आहे. ती गाडीही सुरु करण्यात यावी. जेऊर रेल्वे स्थानकावरील रिझर्वेशन करण्याची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत करण्यात यावी. सोलापूर- अजमेर एक्स्प्रेस या साप्ताहिक गाडीला जेऊर स्थानकावर थांबा देण्यात यावा.
जेऊर हे करमाळा, जामखेड, इंदापूर, परांडा, भूम, कर्जत या तालुक्यांना संलग्न असणारे मध्ये रेल्वेवरील स्थानक आहे. या भागातून हजारो प्रवाशी रेल्वेने सतत ये-जा करत असतात. सोलापूर, पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगलोर या ठिकाणी सतत प्रवास सुरु असतो. येथे गाडयांना थांबा मिळाल्यास प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे.
जेऊर रेल्वे स्थानकावर थांबत असलेल्या इंद्रायणी इंटरसिटी या गाडीची पुण्याच्या दिशेने जाताना रिझर्वेशन तिकीट विक्री दौंड जंक्शनपेक्षा 6 पटीने जास्त आहे. जेऊर स्थानकावरून पुण्याच्या दिशेने जाणारे व पुण्यातून जेऊर स्थानकावरून उतरणारे इंद्रायणी सुपरफास्ट या गाडीला रिझर्वेशन करून चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांची दररोजची सरासरी संख्या 42 आहे. याच धरतीवर सकाळ ‘हुतात्मा इंटरसिटीला’ जेऊर येथे थांबा देण्यात यावा. जेऊर रेल्वे स्थानकाचे प्रवासी तिकीट विक्रीतून सरासरी दिवसाचे 75 हजार उत्पन्न आहे, असे सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.