करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील रावगावचे सुपुत्र उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. ते उदगीर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या मतदार संघाच्या यादीमध्ये महिलांच्या व युवकांच्या मतदार म्हणून नोंदणीचे प्रमाण खूपच कमी होते. ही बाब उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी युवक मतदार नोंदणीमध्ये उदगीर मतदार संघातील 58 शाळा व कॉलेजवर सात हजार विद्यार्थ्यांची नव मतदार म्हणून नोंदणी केली.
उदगीर मतदार संघाचे लिंग गुणोत्तर 887 होते जे की इतर मतदारसंघ व राज्याच्या सरासरीपेक्षा खूपच कमी होते कारण महिला मतदारांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी उदगीर यांनी उदगीर मतदार संघातील एक लाख 95 हजार महिलांचे सर्वेक्षण बचत गट प्रतिनिधी व अंगणवाडी ताई यांच्यामार्फत करून घेतले. ज्यामध्ये 9500 मतदार नोंदणी न केलेल्या महिला आढळून आल्या. ज्यांची लगेचच बीएलओ मार्फत मतदार नोंदणी पूर्ण करून घेण्यात आली. त्यामुळे उदगीर मतदार संघाचे लिंग गुणोत्तर 887 वरून 911 म्हणजे तब्बल 24 ने वाढले आहे. याबद्दल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यापूर्वीच उदगीर मतदार संघाचे या कामाबद्दल कौतुक केले होते. जून 2023 ते डिसेंबर 2023 या सहा महिन्यांमध्ये त्यांनी 18 हजार नव मतदारांची नोंदणी पूर्ण करून घेतली.
गेल्या सहा महिन्यांमध्ये उदगीर मतदार संघातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळाधिकारी,तलाठी, अंगणवाडी ताई, बचत गट प्रतिनिधी आणि सर्व बीएलओ यांनी केलेल्या अविरत आणि अचूक कामामुळे हा पुरस्कार मिळाल्याची प्रतिक्रिया करमाळ्याचे भूमिपुत्र आणि उपविभागीय अधिकारी श्री. सुशांत शिंदे यांनी दिली.
उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुशांत शिंदे यांचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी विशेष अभिनंदन केले तसेच करमाळा तालुक्यातील राजकिय मान्यवर हस्ती व रावगाव आणि पंचक्रोशीतील मान्यवरांकडुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.