करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील चारपैकी दोन साखर कारखाने याही वर्षी बंद आहेत. बंद असलेला श्री आदिनाथ हा आमदार नारायण पाटील यांच्या तर दुसरा श्री मकाई हा भाजपचे बागल यांच्या ताब्यात कारखाना आहे. कमलाई व विहाळ कारखाना सुरु असला तरी या हंगामात आतापर्यंत बारामती ऍग्रोने करमाळा तालुक्यातील सर्वाधिक ऊस गाळप केला आहे. तर दुसरा क्रमांकावर अंबालिका असून तिसरा स्थानावर बाबूराव बोत्रे पाटील यांचा ओंकार शुगर आहे.
राज्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे यावर्षी ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरला सुरु झाला होता. ऊस गाळप हंगाम सुरु झाल्यानंतरही अनेक ठिकाणी पाऊस आणि ऊसाचे शेत ओले असल्याने गाळपासाठी अडचणी येत होत्या. आता सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु झाले आहेत. करमाळा तालुक्याच्या सीना भागात ८६०३२ ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने या भागात कारखान्याची यंत्रणा जास्त असल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हंगाम सुरु झाल्यापासून करमाळा तालुक्यातील सर्वाधिक ऊस बारामती ऍग्रोने गाळपासाठी नेला असल्याचे दिसत आहे. शेटफळगडे युनिट १ व हाळगाव युनिट ३ या दोन्ही कारखान्याने साधारण ३ लाख ६० हजार मेटन ऊसाचे गाळप केले असल्याची माहिती आहे. अंबालिका कारखान्याने साधणार १ लाख ६७ हजार मेटन ऊस गाळप केले असल्याची माहिती आहे.
बाबूराव बोत्रे पाटील यांच्या ओंकार शुगरची राज्यभर ऊसक्षेत्रात चर्चा असून त्यांच्या हिरडगाव, म्हैसगाव, घोगरगाव व चांदपुरी येथील कारखान्यांनी साधणार ७० हजार मेट्रिक टन ऊस गाळपासाठी नेला असल्याची माहिती आहे. याशिवाय कमलाईने आतापर्यंत १ लाख ४० हजार मेट्रिक टन ऊस गाळप केला असून त्यात करमाळा तालुक्यातील गाळप ऊस किती आहे हे समजलेले नाही. विहाळ येथील साखर कारखान्याने आतापर्यंत ४० हजार मेट्रिक टन ऊस गाळप केला असल्याची माहिती आहे. श्री विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याला देखील मोठ्याप्रमाणात ऊस गाळपासाठी जात आहे.
बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे म्हणाले, ‘करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्यासाठी कारखाना प्राधान्य देत आहे. शेतकऱ्यांच्या विश्वास पात्र राहून कारखाना ऊस गाळप करत आहे. योग्य दर आणि वेळेत शेतकऱ्यांचे पैसे यामुळे शेतकऱ्यांचाही विश्वास वाढत आहे. तालुक्यातील सर्व ऊस गाळप केला जाणार असून प्रोग्रॅमनुसार ऊस तोड यंत्रणा काम करत असून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.
फेब्रुवारी- मार्चपर्यंत हंगाम चालण्याची शक्यता
यावर्षी नोव्हेंबरला कारखाने सुरु झाले होते. चांगला ऊस उचलण्यावर कारखानदार व वाहतूकदारांचा डोळा असून कारखाना सुरु होऊन एक महिना झाला आहे. यावर्षी फेब्रुवारी- मार्च पर्यंत कारखाना गाळप हंगाम चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्येक कारखान्याकडे नोंद झालेल्या ऊसाचे क्षेत्र वेगवेगळे आहे.
