करमाळा (अशोक मुरूमकर) : टाकळी चौक येथील सोने चोरीप्रकरणातील संशयित आरोपीला अटक करून करमाळा पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलसह दोन लाखांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. खातगाव येथील एका महिलेची पर्स पडल्यानंतर ती उचलून देण्याच्या बहाण्याने संशयित आरोपीने लंपास केली होती. त्यात १ लाख ६० हजाराचे सोन्याचे दागिने होते. संशयित आरोपीवर दौंड पोलिस ठाण्यातही दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजीत माने यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली. झिंगड्या उर्फ हरी पानफुल्या भोसले (रा. टाकळी, ता. करमाळा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी आशा सोपान रणसिंग (वय 48, रा. खातगाव) या कर्जत तालुक्यातील राशीन (जि. अहिल्यानगर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीसाठी आहेत. 15 फेब्रुवारीला त्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास टाकळी चौक येथून जात होत्या. तेव्हा खातगाव चौक परिसरात त्यांची १ लाख ६० हजाराचे दागिने असलेली पर्स पडली होती. दरम्यान संशयित आरोपीने फिर्यादी या फोनवर बोलत असताना पर्स उचलून देण्याच्या बहाण्याने लंपास केली. त्यानंतर तो फरार झाला होता. या प्रकरणात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अमलदारांनी संबंधित गाडी मालकाची माहिती मिळवली. त्याचा तपास घेत संशयित आरोपी भोसलेला ताब्यात घेण्यात आले. घटना घडल्यापासून संशयित आरोपी हा फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र पोलिस निरीक्षक माने यांनी दोन पथके तयार करून संशयित आरोपीची माहिती काढली. योग्य त्या सूचना देऊन त्याला पकडण्यात आले. भोसले हा वारंवार वास्तव्य बदलून राहत होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी गोपनीय माहितीमार्फत त्याची माहिती मिळवली. सखोल तपास करून असता त्याला ताब्यात घेण्यात आले आहे, असे माने यांनी सांगितले. संशयित आरोपीवर दौंड पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस हेडकॉन्स्टेबल अजित उबाळे, पोलिस नाईक मनीष पवार, वैभव टेंगल, अमोल रंदिल, योगेश येवले, गणेश खोटे, समाधान भराटे व सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल व्येंकटेश मोरे यांनी परिश्रम घेतले.