करमाळा (सोलापूर) : बचत गटाच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणात संशयितावर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी, अन्यथा १४ ऑगस्टपासून अमरण उपोषण केले जाईल, असा इशारा महिलांनी निवेदनाद्वारे दिला आहे. नायब तहसीलदार शैलेश निकम यांनी हे निवेदन स्विकारले असून या निवेदनावर १६ महिलांच्या सह्या आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही कष्टकरून थोडे थोडे पैसे जमा करत बचत गट उभा केला. या प्रकरणातील संशयित आरोपी महिलेने कर्ज उभा करून दिले. त्यानंतर तिने एका एका महिलेला भेटून त्यांच्या नावे बँक व पतसंस्थेचे कर्ज काढले. त्या कर्जाची १० ते १५ टक्के रक्कम तिने भरलीही. मात्र राहिलेले कर्ज तक्रारदार महिलांना भरावे लागणार आहे, असे त्यात म्हटले आहे. या प्रकरणात संशयित आरोपी महिलेवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर अश्विनी सावंत, मंजिरी परदेशी, संध्या कुलकर्णी, संगीता वनारसे, भाग्यश्री येवले, राजश्री गवळी, अर्चना लोकरे, शुभांगी वायकर, साधना काळे, अस्मिता जवकर, सुजाता चोरमले, मेघा कांबळे, छाया यादव, पूनम खोले, सविता सुपेकर व रेश्मा शिंदे यांच्या सह्या आहेत. बुधवारी (ता. ९) तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांनाही या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.