करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यात दिवसांदिवस पाणी टंचाई वाढू लागली आहे. त्यातूनच घोटी व साडे नंतर आता फिसरे व वरकाटणे येथेही टँकर मंजूर झाला आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या माध्यमातून टंचाईवर मात करण्यासाठी रावगाव, निंभोरे, देलवडी, अळसुंदे, सालसे, साडे, घोटी व वरकाटणेला पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर मिळावेत याचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यातील चार गावांसाठी टँकर मंजूर झाले आहेत.
करमाळा तालुक्यातील सीना नदी कोरडी पडली आहे. मांगी तलावही कोरडा पडण्याची शक्यता आहे. कोळगाव धरण तळ गाठू पाहत आहे. उजनी धरणाचीही पाणी पातळी कमी झाली आहे. करमाळा तालुक्याला पाणी पुरवठा करणारे महत्वाचे तलावही तळ गटात आहेत, त्यामुळे दिवसांदिवस पाणी टंचाई वाढू लागली आहे. त्यातून टँकरची मागणी वाढली आहे.
करमाळा तालुक्यात टंचाईवर मार्ग काढण्यासाठी तहसीलदार ठोकडे यांच्या माध्यमातून प्रशासन उपाययोजना करत आहे. गटविकास अधिकारी मनोज राऊत, नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, नायब तहसीलदार काझी हे देखील सर्वबेंबीवर लक्ष ठेऊन आहेत. काही प्रमाणात पाणी टंचाई कमी व्हावी म्हणून आमदार संजयमामा शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या माध्यमातून पत्रव्यहावर करत कुकडीच्या पाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याचा आदेश दिला आहे.
करमाळा तालुक्यात साडे व घोटी येथे टँकर सुरु होता. यामध्ये साडे व घोटीत अडीच खेपा मंजूर होत्या तर तेथे आता पाण्याची मागणी वाढली असून २४ हजार लिटर पाण्याच्या तीन खेपा करण्याची मागणी नागरिकांची आहे. फिसरे येथे १२ हजार लिटरच्या दोन व वरकाटणेला अडीच टँकरला मंजुरी मिळाली आहे, असे जहांगीर यांनी सांगितले आहे. टँकर भरण्यासाठी या भागात मिरगव्हाण हा पाँईट आहे.