करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोथरे येथील बेकायदा दारूविक्री त्वरित बंद करा, अन्यथा स्वातंत्र्य दिनी (१५ ऑगस्टला) करमाळा तहसील कार्यालयासमोर उपोषण केले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. याबाबत देण्यात आलेल्या निवेदनावर ८६ नागरिक व ६० महिलांच्या सह्या आहेत. महिलांसह संतप्त नागरिकांनी एकत्र येत आज (शुक्रवारी) तहसील कार्यालय येथे प्रशासनाला निवेदन दिले. सहायक पोलिस निरीक्षक एम. एन. जगदाळे व नायब तहसीलदार शैलेश निकम यांनी त्वरित दारू बंद करून यातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
करमाळा- जामखेड रस्त्यावर करमाळ्यापासून पाच किलोमीटरवर पोथरे गाव आहे. येथे शनीचे प्रसिद्ध मंदिर आहे. मात्र येथे बेकायदा दारू विक्री होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. आठ दिवसांपूर्वीच एकाने दारूमुळे आत्महत्या केली, असे यावेळी सांगण्यात आले. यापुढे पुन्हा गैरप्रकार होऊ नये म्हणून गावकरी एकवटले आहेत.
गावात एसटी बस स्टॅन्डसह परिसरात सहा ठिकाणी बेकायदा दारू विक्री होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. गावातील विद्यार्थी व शेजारील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही दारू विक्री त्वरित बंद करा, अशी मागणी केली आहे. गावातील संस्कृती महिला ग्रामसंघ व राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयानेही या मागणीला पाठींबा दिला आहे. निवेदन देतेवेळी सरपंच धंनजय झिंजाडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी महिलाही उपस्थित होत्या.
‘गावात बेकायदा दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींची नावेही कळवण्यात आली आहेत. याबाबतचा अहवाल प्रशासनाला देण्यात आला आहे. दारूमुळे गावाचे नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पहावे. दारू बंदीसाठी पोलिस पाटील म्हणून संपूर्ण सहकार्य केले जाईल,’ असे पोलिस पाटील संदीप पाटील यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.