करमाळा (अशोक मुरूमकर) : सरकारने मराठा कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याबाबत संपूर्ण राज्यात मोहीम सुरू केली आहे. त्यात करमाळा तालुक्यात आजपर्यंत (शुक्रवारी) 10 हजार 893 नोंदी सापडल्या आहेत. नोडल अधिकारी प्रभारी तहसीलदार विजकुमार जाधव व सहाय्यक नोडल अधिकारी एस. एम. काझी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोधम सुरु आहे. महसूल विभागाकडील या नोंदी आहेत.
करमाळा तालुक्यात महसूल विभागाकडून 3 लाख ८ हजार ९२२ अभिलेख तपासण्यात आले. त्यात १० हजार ८९३ कुणबी मराठा नोंदी सापडल्या आहेत, असे नोडल अधिकारी जाधव यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांना निर्देश दिले आहेत.
महसूल विभागाचे रेकॉर्ड, जन्ममृत्यू नोंदणी रजिस्टर, क, ड, ई पत्रक, सर्व्हे नंबर उतारे या अभिलेखाची तपासणी केली जात आहे. यामध्ये मराठी तसेच मोडी लिपीमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दक्षिण तहसील कार्यालयातील अभिलेख तपासणी पथकाला मराठा कुणबी नोंदी अभिलेखात कशा पद्धतीने तपासव्यात तसेच मोडी लिपीत मराठा कुणबी शब्द कशा पद्धतीने आहे याबाबत माहिती दिली आहे.
तालुक्यात सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोंदीमध्ये मराठा कुणबी जातीच्या नोंदीचा अधिक गतीने व सूक्ष्मपणे शोध घ्यावा. तसेच नागरिकांनीही त्यांच्याकडे मराठा कुणबी नोंदी असलेली जुने अभिलेखे असतील तर त्याबाबत मदत कक्षास माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.