मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या भगव्या वादळात करमाळा तालुक्यातील साधारण १० हजार समाजबांधव सहभागी झाले आहेत. वांगी परिसरातून हे समाजबांधव मनोज जरांगे यांच्या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. सोलापूर जिल्हा समानव्यकांच्या सूचनेनुसारही अनेक समाजबांधव हे भिगवणमार्गे पुणे येथे पदयात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगितले जाते. तर अनेक समाजबांधव हे मनोज जरांगे यांच्याबरोबर पदयात्रेत सहभागी झाले आहेत. सोलापुर जिल्हयातून अनेक समाज बांधव भिगवणमार्गे जात आहेत. त्यातील काही समाजबांधवांचा आज (रविवारी) भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेवर मुक्काम आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे २६ जानेवारीपासून उपोषण करणार आहेत. त्यासाठी पदयात्रेने त्यांनी अंतरवली सराटी येथून मुंनबाईकडे कूच केली आहे. करमाळा तालुक्यातील सहभागी झालेल्या समाजबांधवांच्या माहितीनुसार वांगी परिसरातून मोटारसायकली, पिकअपसह इतर गाड्यांमधून समाजबांधव सहभागी झाले आहेत. पुण्यात तालुक्यातील आणखी समाजबांधव येणार आहेत.
सकल मराठा समाज करमाळा तालुका व शहरच्या वतीने सोलापूर जिल्हा समन्वयक यांच्या उपस्थितीत 14 जानेवारीला करमाळा येथे बैठक घेतली होती. या मेळाव्यामध्ये सोलापूरच्या समन्वयकानी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे भिगवण येथे सोलापूर होऊन निघालेली पदयात्रा दत्तकला येथे मुक्कामी येत आहे. यामध्ये सकल मराठा समाज करमाळाच्या वतीने सोलापूरहून निघालेल्या रॅलीमध्ये सहभागी होऊन तिथून पुढचा प्रवास सोलापूरच्या टीमबरोबर करावा, असे सांगितले आहे. शिवाय या रॅलीमध्ये सहभागी होता येणार नाही त्यांनी मुंबईला तर फिक्स आलेच पाहिजे, अशी विनंती केली आहे.