करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेकडून मार्च अखेरीस निविदा काढण्याचा धडाका उडणार असल्याचे चित्र आहे. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर नगरपालिकेत बांधकाम विभागाकडून प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या १९ कामांच्या २ कोटी ६८ लाख ७७ हजार ५८ रुपयांची निविदा काढली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा निधी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यकाळात आलेला होता. १९ पैकी दोन कामांची फेरनिविदा व दोन कामांची निविदा आज पब्लिश झाली आहे. बाकीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कार्यारंभ आदेश मिळण्याची शक्यता आहे.
करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभा झाली. त्यामुळे ३८ विषयांवर चर्चा झाली. त्यात करमाळा नगरपालिकेच्या सर्व विभागाकडील २०२६-२७ या वर्षाकरिता वार्षिक निविदा काढणे व वैशिष्ट्येपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर कामाच्या नावांमध्ये बदल करणे अशा विषयांवर चर्चा झाली.
मिळालेल्या माहितीनुसार करमाळा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे २ कोटी ६८ लाख ७७ हजार ५८ रुपयांच्या १९ कामांना प्रशासकीय मंजुरी आहे. जिल्हा नियोजन, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व वैशिष्टयपूर्ण योजनांमधून या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. मात्र त्याची निविदा प्रक्रिया झाली नाही. यामध्ये रंभापूर येथे अंतर्गत गटारी बांधणे, घोलप हॉस्पिटल ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मागील बाजूपर्यंत रस्ता काँक्रेट करणे, रमेश कांबळे ते घोडके घर गटार बांधकाम करणे, देविदास कांबळे घर ते नगरपालिका नाला येथे गटार, प्रशांत कांबळे घर ते अविनाश कांबळे घरापासून पुढे सुहास कांबळे घर येथे गटार, सिद्धार्थ भोसले ते दशरथ कांबळे घर गटार, सिद्धार्थ भोसले ते मधुकर थोरात घर रस्ता काँक्रेट, सिद्धार्थनगर येथील अंगणवाडी २ ते जीवन कांबळे घर गटार, राहिब कांबळे घर ते नाला गटार, संताजी नगर येथील अंतर्गत रस्ते काँक्रेटीकरण, मंगळवार पेठ काझी बोळ ते बारामती सहकारी बँक बोळ रस्ता काँक्रेटीकरण, गटार बांधणे व पेव्हिंग ब्लॉक बसविणे, शितोळे घर ते गणपती मंदिर रस्ता व गटार, गणेश नगर येथे ओपन स्पेसमध्ये महिला भवन, महाराणा प्रताप पुतळा ते सुकुमार दोशी घरापर्यंत गटार, कुंभारवाडा ते कत्तलखाना रस्ता, राहुल निकम घर ते जुने महाराजा वाईन शॉप गटार, रंभापूरात सामाजिक सभागृह, रंभापूरात धोबी घाटाजवळ संत कैकाडी महाराज समाज मंदिर, प्रभाग ५ मधील राधेशाम देवी ते जुना बायपास रस्ता नाल्याची रिटेनिग वॊल बांधकाम करणे अशा १९ कामाची २ कोटी ६८ लाख ७७ हजार ५८ रुपयांची निविदा काढली जाणारा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
