करमाळा (सोलापूर) : करमाळा- हिवरवाडी- भोसे- वडगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत या मागणीसाठी आज (गुरुवारी) नागरिकांनी उपोषण केले. दरम्यान प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र सरकारकडून निधी उपलब्ध होऊन काम कधी होईल, यावर विश्वास नसल्याचे सांगत नागरिकांनी लोकवर्गणी करत मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
करमाळा- हिवरवाडी रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होतहोती. करमाळ्यात शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी सायकलवर येतात. खड्डे जास्त असल्याने विद्यार्थी पडून किरकोळ जखमी झाले आहेत. करमाळ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्याने हिवरवाडीतील नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत होता. भोसे व वडगावचेही नागरिक याच रस्त्याने प्रवास करत असतात. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला आहे.
सरपंच अनिता पवार, सुप्रिया पवार यांच्यासह अनेक नागरिक व विद्यार्थी उपोषणाला बसले होते. प्रा. रामदास झोळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे, आदिनाथचे माजी संचालक रमेश कांबळे, भोसेचे प्रतिम सुरवसे, माजी सरपंच भोजराज सुरवसे, वडगावचे उपसरपंच अंकुश शिंदे, सौरभ पवार आदींनी या आंदोलनात सहभागी होऊन सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रशासनाच्या वतीने उपअभियंता श्री. गायकवाड, श्री कन्हेरे, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड आदींनी निवेदन स्वीकारले.