Video : करमाळ्यात कमळ चिन्हावरच नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडणूक लढणार : कल्याणशेट्टी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी पहिल्यांदाच भाजपकडे इच्छुकांचा संख्या जास्त आहे. सर्वांच्या मुलाखतीचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला जाणार असून उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार आहेत. त्यात पालकमंत्री जयकुमार गोरे व प्रदेशाध्यक्ष यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. मात्र काहीही झाले तरी नगराध्यक्षपदाचा उमेदवार ‘कमळा’च्याच चिन्हावर लढणार व जिंकणार, असा विश्वास निवडणूक प्रमुख आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या आमदार शेट्टी व शशिकांत चव्हाण यांनी मुलाखती घेतल्या. यावेळी भाजपच्या महिला प्रदेशच्या उपाध्यक्षा रश्मी बागल, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, तालुकाध्यक्ष रामा ढाणे, सचिन पिसाळ, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, भाजपचे कन्हैयालाल देवी, प्रा. रामदास झोळ, सूर्यकांत पाटील आदी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष शैकात नालबंद, संजय घोरपडे, माजी नगरसेवक अतुल फंड, राजश्री माने, सचिन घोलप, जयकुमार कांबळे, सुहास घोलप आदी उपस्थित होते.

आमदार शेट्टी म्हणाले, ‘निवडणूक जिकंण्यासाठी व्यूहरचना व्यवस्थीत करा. निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. भाजपात प्रमाणिक काम करणाऱ्याला संधी आहे. जुने आणि नवे यांचा मेळ घालून काम करा. उमेदवारी देताना मेरिट पाहिले जाईल. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. काहीही करून या निवडणुकीत करमाळा नगरपालिकेवर कमळ फुलवा’, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

माजी आमदार जयवंतराव जगताप (महायुती शिंदे यांची शिवसेना) यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, ‘नगराध्यक्षपद हे भाजपच लढणार आहे. महायुतीचा निर्णय वरिष्ठ घेतील. नगराध्यक्षपदसोडून इतर जागांबाबत काही वेगळा निर्णय होऊ शकतो. पण नगराध्यक्षपदाबाबत काहीही तडजोड होणार नाही.’ असे उत्तर त्यांनी दिले. नगराध्यक्षपदासाठी बंडखोरी होणार नाही. ज्या उमेदवाराचे नाव समोर येईल त्याचेच काम सर्व करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *