करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर नेमण्यात आलेले सल्लागार आज (बुधवारी) कारखान्याची पहाणी करणार आहेत. त्यानंतर भूमिका स्पष्ट करणार आहेत, अशी माहिती हरिदास डांगे यांनी दिली आहे. आदिनाथ कारखान्यावर सल्लागार म्हणून डांगे यांच्यासह सुहास गलांडे, अच्युत पाटील, धुळाभाऊ कोकरे व डॉ. वसंत पुंडे यांची नेमणूक झाली आहे. या नेमणुकीनंतर पहिल्यादाच ते कारखान्यावर येणार आहेत.
आदिनाथ कारखाना यंत्रणेअभावी अडचणीत आला आहे. कारखाना सुरु करताना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप प्रशासकीय संचालक मंडळावर होत असताना सल्लागार नेमण्यात आले आहेत. बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनीही कारखाना प्रशासनावर गंभीर आरोप करत मंत्री सावंत यांच्यावर निशाणा साधला होता. त्यात सल्लागारांची भूमिका महत्वाची मानली जात असून त्याकडे लक्ष लागले आहे.
आदिनाथ कारखाना येथे सकाळी साडेदहा वाजता सर्व सल्लागार एकत्र येणार आहेत. त्यानंतर कारखान्याची पहाणी करून आपली भूमिका मंडळी जाईल, असे डांगे यांनी सांगितले आहे. कारखाना अडचणीत आहे. मात्र अशावेळी काय निर्णय घेतला पाहिजे हे ठरवले जाणार आहे. सल्लागार नियुक्तीचे पत्र मिळाल्यापासून काहीजण पद स्वीकारणार नाहीत, असे सांगितले जात होते. तर काहींनी योग्यवेळी भूमिका मांडू असे स्पष्ट केले होते. त्यामुळे आज नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोकरे यांनी यापूर्वीच या पदाचा स्वीकार करून कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे सांगितले होते.