करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील ५ हजार ६०० लाभार्थ्यांचे घरकुलाचे अखेर स्वप्न पूर्ण होणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या घरकुल बांधणीसाठी सरकारने मंजुरी दिली असून करारनामे करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. लाभार्थ्यांनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना केले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात साधारण ५० लाभार्थ्यांची यामध्ये घरे आहेत.
ग्रामीण भागात गावागावात पात्र लाभार्थ्याला घर बांधण्यासाठी सरकार विविध योजनेतून आर्थिक मदत देते. पंतप्रधान आवास योजना ही त्यातीलच एक आहे. या योजनेसाठी साधारण १२ हजार पात्र लाभार्थ्यांची सरकारकडे तालुक्याची वेटींग लिस्ट आहे. त्यातील साधणार ५ हजार ६०० लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यात ७३७ लाभार्थ्यांची घरकुल पूर्ण झाली आहेत.
घरकुल बांधण्यासाठी रोजगार हमी योजनेतूनही साधणार २० हजार मदत मिळते. लाभार्थ्यांनी वेळेत घरकुल बांधणे आवश्यक आहे. सध्या ही प्रक्रिया वेगाने सुरु असून मार्चएंड प्रयत्न संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात पैसे मिळतील असे सांगितले जात आहे. घरकुल लाभार्थ्याला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे, असे डॉ. कदम यांनी सांगितले आहे.
लाभार्थ्याला घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसेल आणि नियमात बसत असले तर त्यासाठी मदतही देते. जागा खरेदीसाठीही सरकार मदत देते. मात्र निकषात बसणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी वेळीच आपली कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन गटविकास अधिकारी डॉ. कदम यांनी केले आहे.