Jagtap King in Karmala politics but who is the maker of this unexpected developmentJagtap King in Karmala politics but who is the maker of this unexpected development

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत ऐतिहासिक निर्णय होत मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील परस्परविरोधी जगताप, पाटील व बागल एकत्र आले. आणि निवडणुक बिनविरोध करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. शेवटच्याक्षणी अतुल खुपसे व भाजपचे काही अर्ज राहिल्यामुळे उत्सुकता लागली होती. या निवडणुकीत तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार जयवंतराव जगताप हे ‘किंग’ ठरले आहेत. मात्र ही अशक्य घडामोड घडवणारा नेमका ‘मेकर’ (निर्माता) कोण आहे? याची चर्चा करमाळ्याच्या राजकारणात सुरु झाली आहे. या सर्व गोष्टींचा सूत्रधार कोण याची उकल अद्यापही झालेली नाही आणि भविष्यातही ती लवकर होईल की नाही हे सांगता येत नाही मात्र ‘काय सांगता’ने याच्या खोलात जाऊन काही शक्यता पडताळणी करत घडलेल्या घडामोडीवर भाष्य करण्याचे धाडस केले आहे.

गेल्या २०- २५ वर्षाच्या राजकारणात विलासराव घुमरे यांचा ‘किंगमेकर’ म्हणून उल्लेख केला जातो. करण तालुक्यातील राजकारणात झालेल्या घडामोडीत त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या अवाक्याचा आणि त्यांचे असलेलं प्रत्येकाशी संबंध याचा कोणाला अंदाज येत नाही. त्यामुळे ते काहीही करू शकतात. (अलीकडच्या काळात मात्र घुमरे सरांनी आपली भूमिका राजकारणाच्या बाबतीत सौम्य घेतली असल्याचे दिसून येते) आताच्या बाजार समितीच्या निवडणुकीत अशक्य अशीच घडामोड झाली आहे. ती नेमकी कोणी घडवून आणली आहे, हे पडद्यावर आलेले नाही. मात्र याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.

या’ अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ‘मेकर’ने केल्या शक्य

१) गेल्या पाच वर्षात जगताप आणि बागल गटामध्ये अतिशय टोकाचा संघर्ष होता. अनेकदा खासगीत आम्ही राजकारणात काहीही करू पण एकत्र येणार नाही हे ठासून सांगत होते. वास्तविक त्यांचे टोकाचा संघर्ष असण्याचे कारण व्यक्तिगत काहीच नव्हते. याचा परिणाम थेट राजकारणावर होता. राजकारणात एकमेकांचे मतभेद असतात पण मनभेद असतील तर त्याचा थेट परिणाम विकासावर होतो आणि व्यक्तिगत आयुष्यावरही होतो. गेल्या निवडणुकीत झालेला संघर्ष आणि त्यातून झालेला दुरावा यामुळे हे एकत्र येऊ शकत नाहीत, असे अंदाज होते. मात्र राजकारणात कायमचा कोण कोणाचा शत्रू आणि कोण कोणाचा मित्र नसतो हेच लक्षात घेऊन हे शक्य करून दाखवले.

२) पाटील आणि बागल हे दोन्ही गट एकत्र येतील असे अनेकांचे अंदाज होते. मात्र त्यांच्यातही टोकाचा संघर्ष होता. त्यामुळे त्याच्यात एकी होईल का? नाही हे स्पष्ट नव्हते. गेल्यावर्षी ‘आदिनाथ’ सुरु करतेवेळी झालेल्या सर्वसाधारण सभेत रश्मी बागल व माजी आमदार नारायण पाटील यांच्यात सर्वांसमोरच विधानसभेवरून शाब्दिक वाक्युद्ध झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोळी टाकण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा या दोघांना एकत्र काम करण्याचे सांगितले होते. मात्र तेव्हाही त्याच्यात समझोता झाला नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने मात्र ते शक्य झाले. पाटील- बागल एकत्र येतील की नाही अशी शंका अन्य त्यांना वाटत असताना या घटनेमुळे भविष्यात पाटील बागल आणि जगताप ही एकत्र काम करू शकतात हाही संदेश यातून गेला आहे.

३) पाटील आणि जगताप यांच्यातही समज- गैरसमज होते. गेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत ऐनवेळी प्रा. शिवाजी बंडगर यांनी बागल गटाला पाठींबा दिला आणि जगताप यांच्या ताब्यातील बाजार समिती गेली. याचा राग जगताप गटाने पाटील यांच्यावर काढला होता. त्याचा परिणाम थेट विधानसभा निवडणुकीवर झाला. जगताप यांनी शिंदे गटाला पाठींबा दिला. बंडगर हे पाटील गटाचे होते. त्यांच्यामुळेच आपली बाजार समिती गेली याची सल जगताप गटाच्या मनात राहिली. जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला पाठींबा दिला होता. मात्र या निवडणुकीत पाटील आणि जगताप यांनाही एकत्र आणले आहे.

४) तालुक्यातील जगताप, पाटील व बागल हे तिन्ही गट एकमेकांचे विरोधक मात्र त्यांना एकत्र आणायचे हे तर आव्हान होतेच पण ते कोणाच्या नेतृत्वाखाली एकत्र आणायचे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे करमाळा दौरे वाढत असताना त्यांचा कोठेही उल्लेख न करता थेट मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आणणे हे तसे आव्हान होते. मात्र मोहिते पाटील यांची करमाळा तालुक्याशी जोडलेली नाळ आणि त्यांची तालुक्यात असलेली पकड हे कदाचित त्यांनी जमलेले असू शकते. बागल व जगताप या गटाचे काही दिवसांपासून मोहिते पाटील यांच्याशी दुरावाचं होता. मात्र अशा स्थितीतही जगताप, पाटील व बागल यांच्यात त्यांनी समझोता घडवून आणला.

५) आमदार शिंदे आणि जगताप यांच्यात जवळीक आहे. शिंदे आणि मोहिते पाटील यांच्यात मात्र संघर्ष आहे. असे असताना जगताप हे शिंदे यांचा पाठींबा घेऊन मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत बागल व पाटील यांच्याबरोबर बैठकीला गेले. शिंदे यांची जवळीक कायम ठेवायला लावणे (भविष्यात राहील का नाही हे माहित नाही) व पाटील, बागल व मोहिते पाटील यांचाही पाठींबा मिळवून बाजार समिती बिनविरोध ताब्यात मिळवणे हे तसे अश्यक्य होते. हे सर्व शक्यतेच्या पलीकडच्या घटना शक्य करून दाखवणारी एक व्यक्ती पडद्यामागून खूप काही करत राहिली. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात जगताप हे किंग ठरेल आहेत. मात्र हे सर्व घडवून आणणारी व्यक्ती कोण आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

६) मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत अकलूज येथे बैठक झाली तेव्हा माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार नारायण पाटील, बागल गटाचे दिग्विजय बागल यांच्यासह अजित तळेकर, कल्याण सरडे, देवानंद बागल व नवनाथ झोळ हे उपस्थित होते. मात्र त्यांच्यात जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला होता. तेव्हा प्रत्येकजण आपआपल्या भूमिकेवर ठाम होते.तरीही यातून मार्ग निघेल असा सर्वांना विश्वास ती व्यक्ती तिथे नसतानाही देत होती.

या व्यक्तीने राजकारणाला नवी दिशा देणारी ही घडामोड करुन दाखवली आहे. फक्त स्कारात्मक दृष्टिकोन आणि यांच्यातील नाराजीची कारणे शोधून त्यांनी हे अशक्य वाटणारी राजकीय घडामोड घडवून दाखवली आहे. हे करत असताना आपले नाव कोठेही येणार नाही याची दक्षता स्वतः त्या व्यक्तीने घेतली आहे. या घटनेमुळे यापुढील काळात करमाळा तालुक्यासह जिल्हा पातळीवरही राजकारणाचे परिणाम पहायला मिळणार असून नवी दिशा मिळणार आहे. पडद्यावर न येता जो डाव काहींना साधायचा होता तो उधळून लावत जगताप किंग झाले माञ मेकर कोण हा प्रश्न अनुत्तरितच ठेवला?

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *