करमाळा (अशोक मुरूमकर) : बेशिस्त व निष्काळजीपणे टीपर चालवत कमानीला धडक दिल्याने कमान केबीनवर कोसळून चालकाचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना वांगी नंबर १ येथे घडली आहे. यामध्ये स्वतःच स्वतःच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सोपान ज्ञानदेव शेंडगे (वय २८, रा. गोयेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव असून संशयित म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
वांगी नंबर १ येथे रामचंद्र दशरथ देशमुख यांच्या घराजवळ कमान आहे. या कमानीला एक हायवा धडकला. त्यामुळे सिमेंटची कमान त्याच्या केबीनवर कोसळली. यामध्ये गाडीचे व कमानीचे ५ लाखाचे नुकसान झाले. ९ जुलै २०२४ ला दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली होती. रुपाभवानी मंदिराकडे भरधाव वेगात जाताना मृत्यू झालेल्या चालकाने हायवाचा हौद खाली घेतला नाही. तसाच हौद वर असताना भरधाव वेगात निष्काळजीपणे हायवा चालविल्याने विजेच्या तारा व खांब तुटले. हायवा देखील कमानीस धडकला. त्यामुळे कमानीचा वरचा भाग केबिनवर कोसळला आणि त्यात चालकाचा मृत्यू झाला. याचा तपास करून करमाळा पोलिसात बुधवारी (ता. १४ ऑगस्टला) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल जमीर शेख यांनी यामध्ये फिर्याद दिली आहे.