करमाळा शहराचे पहिले उपनगर दुर्लक्षित, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहराचे पहिले उपनगर म्हणून ओळख असलेल्या शिवाजीनगरमधील नवरत्न कॉलनीत तुटलेल्या गटारींमुळे गाळ युक्त पाण्याचा डोह तयार झाला आहे. यामुळे या दुर्गंधी पसरली आहे. याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांची आहे. दरम्यान ‘नवरत्न कॉलनीतील गटारीच्या कामाबाबत नगरपालिकेच्या ठेकेदाराला सूचना दिल्या असून लवकरच हे काम करण्यात येईल’, असे करमाळा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अभियंता आकाश वाघमारे यांनी सांगितले.

करमाळा शहराचे पहिले उपनगर म्हणून शिवाजीनगरची ओळख आहे. नोकरीनिमित्त करमाळ्यात असलेल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने सुरुवातीला या ठिकाणी घरे घेतली किंवा बांधली होती. मात्र आता गटार तुटल्यामुळे तेथे डोह निर्माण झाला आहे. गटारीतील गाळ काढण्यासाठी खोरेच बसत नसल्याने सफाई कर्मचाऱ्यांना गाळ काढता येत नाही.‌ त्यामुळे दिवसेंदिवस गाळ वाढत आहे.

सुमन कांबळे म्हणाल्या, ‘तुटलेल्या गटारी बाबत आणि स्वच्छता होत नसल्याबाबत अनेक वेळा नगरपालिकेकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत. पालिकेचे अधिकारी येऊन केवळ पाहणी करून जातात. आम्ही सेवानिवृत्त वृद्ध रहिवासी असून आमची मुले नोकरी निमित्त बाहेरगावी असतात. वारंवार नगरपालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने पुढील आठवड्यात आम्ही नगरपालिकेतच ठिय्या मांडून बसणार आहोत’.

जयंत कुलकर्णी म्हणाले, ‘डुकरे आणि कुत्री गाळ युक्त पाण्यात डुंबून इतरत्र अंग झटकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून आम्हाला खिडक्या बंद करून घरात बसावे लागते. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे रस्त्यावरून धड चालता ही येत नसून आमच्या घरासमोरील रस्ता आणि गटारीचे काम तातडीने होणे गरजेचे आहे.’

निर्मला चुंग म्हणाल्या, ‘गटारीचे काम चुकीचे झाल्याने आमच्या सांडपाण्याच्या पाईपातून पाणी परत फिरत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असून दुर्गंधी आणि डासांमुळे लहान मुले आणि वयस्कर लोक आजारी पडत आहेत. मला स्वतःला गोचीड ताप झाल्यामुळे एक महिना उपचार घ्यावे लागले आहेत. नगरपालिकेचे सर्व कर वेळच्यावेळी भरूनही नगरपालिकेकडून आम्हाला कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *