करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील हिवरवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्याने अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे. करमाळा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर हिवरवाडी आहे. मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने खड्डे पडले आहेत. याकडे त्वरित लक्ष देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
हिवरवाडी येथून शिक्षणासाठी रोज साधारण ५० विद्यार्थी करमाळ्याला येतात. हा रस्ता वडगाव दक्षिण व भोसे या गावांसाठीही महत्वाचा आहे. सकाळी पावणेआठ, पावणेदहा वाजताची व सांयकाळी साडेपाच व सात वाजताची कर्जत- करमाळा व करमाळा कर्जत ही एसटी बस या मार्गावरुन जाते. वडगाव येथील विद्यार्थी व नागरीक यांच्या दृष्टीनेही हा रस्ता महत्त्वाचा आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दूर्लक्ष आहे.
या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यात सध्या पावसाचे पाणी साचले आहे. येथून अनेक विद्यार्थी व नागरिक सायकल व मोटारसायकने जातात. त्यांना कसरत करुन येथून प्रवास करावा लागत आहे. याकडे त्वरीत लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. या रस्त्याचा रुग्णांनाही त्रास सहन करावा लागत आहे.