करमाळा (अशोक मुरूमकर) : यावर्षी पाऊस कमी झाल्याने खरिपाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र नंतर पाऊसच न झाल्याने पीक जळून गेली. जी पिके राहिली होती त्याची आवक करमाळा बाजार समितीत सुरु आहे. ज्वारीला मागणी वाढली असून सध्या सोन्याचे दिवस आले आहेत.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (गुरुवारी) १०० क्विंटलची आवक झाली आहे. त्यात कमीतकमी ४५०० रुपये तर जास्तीतजास्त ६ हजार १५० रुपये क्विंटलला दर मिळाला आहे. बाजरीची १० कट्टयांची आवक झाली. त्याला कमीतकमी २ हजार २०० तर जास्तीत जास्त २ हजार ८०० रुपयांचा दर मिळाला आहे. मुगाला कमीत कमी ८ हजार व जास्तीतजास्त ९ हजार ८०० रुपयांचा दर मिळाला आहे. करमाळा बाजार समितीचे सचिव विठ्ठलराव क्षीरसागर म्हणाले, यावर्षी पावसामुळे खरीप पिकांची आवक कमी आहे. मात्र आलेल्या धान्यांना दर चांगला मिळत आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल करमाळा बाजार समितीत आणावा.