करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘करमाळा नगरपालिकेवर भाजपचा नगराध्यक्ष करण्याची जबाबदारी रश्मीदीदी व विलासराव घुमरे सर यांच्यावर आहे’, असे विधान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.
करमाळ्यात आज (शुक्रवार) त्यांनी बागल कार्यालय येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘करमाळ्यात भाजपचा नगराध्यक्ष झाला पाहिजे. त्यासाठी हवी ती मदत मागा. तालुक्याची जबाबदारी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्यावर आहे. त्यामुळे येथे नगराध्यक्ष करणे हि देखील जबाबदारी त्यांच्यावर आम्ही सोपवत आहोत. करमाळ्याचा विकास करण्यासाठी भाजपचा नगराध्यक्ष करा’, असे आवाहन त्यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘सर्व मतभेद विसरून कामाला लागा. सामान्य नागरिकाला भाजपाला मतदान करायचे आहे, मात्र त्याच्यांपर्यंत पोहोचा. करमाळ्याचा विकास करण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध राहणार आहे. दिग्विजय बागल हे देखील प्रचारात दिसतील. शंका कोणी कोणावर घेऊ नका. चांगला प्रचार करा विजय निश्चित आहे’, असेही ते म्हणाले.
यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनिता देवी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, प्रा. रामदास झोळ, किरण बोकन, दीपक चव्हाण, जगदीश अग्रवाल, संतोष घोलप, कन्हैय्यालाल देवी आदी उपस्थित होते.
