करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील दहिगाव, कुकडी, डिकसळ पूल, जातेगाव – टेंभुर्णी मार्ग आदींचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. माझे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला. आदिनाथ कारखाना देखील आम्ही व्यवस्थित सुरु करणार होतो. मात्र कुरघोडीच्या राजकारण आम्हाला नडले. त्यात माझा पराभव झाला. माझ्याबद्दल विरोधकांनी काहीही अफवा पसरवल्या तरी नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नसून प्रत्येक हालचालीवर लक्ष आहे. माझी कर्मभूमी ही करमाळाच राहणार आहे. तुम्ही चिंता करू नका’, असे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
टाकळी (रा) येथे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती ॲग्रोचे उपाअध्यक्ष सुभाष गुळवे होते. ॲड. नितीनराजे भोसले, सतीश शेळके, भरत खाटमोडे, ॲड. अजित विघ्ने, ॲड. सुमित गिरंजे, बाळकृष्ण सोनवणे, राजेंद्र धांडे, मनोहर हंडाळ, सुभाष अभंग, विकास गोंदकर, गौरव झांजुर्णे, सुनिल ढवळे, शंकर जाधव, शंकर कवडे आदी मंचावर होते.
माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘टाकळीमध्ये गेल्या पाच वर्षात नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार निधी दिला. ती कामे अतिशय उत्कृष्टपणे झाली आहेत. त्याची जाण ठेऊन नागरिकांनी माझ्याच हस्ते या कामांचे लोकार्पण केले हे महत्वाचे आहे. राजकारणाच्या पालिकडे जाऊन मी निधी दिला आणि त्याचप्रमाणे माझ्याच हस्ते तुम्ही या कामांचे लोकार्पण केले याबाबत मी आपला आभारी आहे.’ ‘माझे आणि सुभाष गुळवे यांचे पहिल्यापासून खूप चांगले सबंध आहेत. ते जिल्हा परिषदेत होते तेव्हापासून आम्ही बरोबर आहोत’, असेही माजी आमदार शिंदे म्हणाले.
गुळवे म्हणाले, ‘माजी आमदार शिंदे यांच्यामुळे टाकळीत मोठा निधी मिळाला. त्यांनी कायम विकासाला महत्व दिले. बारामती ऍग्रोच्या माध्यमातून आम्ही या भागातील शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न सोडवला आहे. माजी आमदार शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरु करणार होतो. मतदारांचा निर्णय चुकल्याने काय अवस्था झाली आहे. बारामती ऍग्रो व अंबालिका हे कारखाने नसते तर काय अवस्था झाली असती शेतकऱ्यांची? असाही प्रश्न त्यांनी केला. राजकारणासाठी तालुक्यात संस्थांचे नुकसान झाले आहे.’ पुढे बोलताना गुळवे म्हणाले, ‘आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहे. विधानसभा निवडणुकीत शरीराने आम्ही दुसरीकडे होतो पण मनाने कधीच नाही. आमच्या नेत्यांच्या निर्णयानुसार आम्ही तेथेही एकनिष्ठच काम केले’ असेही ते म्हणाले. यावेळी ऍड. विघ्ने यांनीही मनोगत व्यक्त केले.
डॉ. गोरख गुळवे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले ‘ज्या कामासाठी आम्ही अनेक आमदारांकडे पाठपुरावा करत होतो. मात्र कोणीही निधी दिला नाही. माजी आमदार शिंदे यांनी विकास कामात राजकारण केले नाही. त्यांनी गावासाठी मोठ्याप्रमाणात निधी दिला.’ सुग्रीव दोडमिसे, उपसरपंच दत्तात्रय लाळगे, रामभाऊ धंगेकर, नामदेव गोडसे, नितीन इरचे, तात्या पाटील, आजिनाथ लाळगे, रामभाऊ कोकाटे, योगेश तानवडे, सागर गोडसे, राजाभाऊ जाधव, पांडूरंग कोकाटे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
