करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नाव बदलण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. त्यात करमाळ्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव मदनदास देवी असे करण्यात आले आहे. याबाबतचा सरकार निर्णय अवर सचिव भास्कर बनसोडे यांनी काढला आहे.
राज्यात शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येते. युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवणे व खासगी औद्योगिक आस्थापनांना मन्युष्यबळ पुरवठा केला जातो. राज्यात सध्या ४१९ शासकीय व ५८५ खासगी संस्था आहेत.
देवी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुशल संघटक ज्येष्ठ प्रचारक होते. जुलै २०२३ मध्ये त्यांचे बंगळरू येथे निधन झाले होते. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटन मंत्री व राष्ट्रीय स्वयंसंघाचे सहकार्यवाह होते. ते मूळचे करमाळ्याचे होते. शालेय शिक्षणांनंतर तर १९५९ मध्ये पुण्यात गेले. बीएमसीसी महाविद्यालयात त्यांचे उच्च शिक्षण झाले. त्यांचे बंधू कुशलदास देवी यांच्या प्रेरणेने ते संघाच्या संपर्कात गेले. आता करमाळ्यातील आयटीआयला सरकारने त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

