करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध महायुतीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात खरी लढत होणार आहे. येथे वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारस्कर हे देखील निर्णायक भूमिकेत राहतील. गेल्या निवडणुकीत निंबाळकरांना विजयी करण्यात मोहिते पाटील यांचा वाटा महत्वाचा होता. मात्र आता तेच एकमेकांच्या विरोधात आहेत. तर गेल्यावेळी निंबाळकर यांच्याविरोधात असलेले आमदार संजयमामा शिंदे हे निंबाळकरांबरोबर आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी निंबाळकर, मोहिते पाटील व बारस्कर यांचे अर्ज दाखल झालेले आहेत. सर्वांकडूनच आता प्रचार सुरु आहे. या निवडणुकीत अनेक अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने अजून अर्ज दाखल झाले तरी मोहिते पाटील व निंबाळकर यांच्यात प्रमुख लढत असल्याचे चित्र आहे.
निंबाळकर हे गेल्या निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्याविरुद्ध करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे हे होते. शिंदे व निंबाळकर यांच्या लढतीमध्ये निंबाळकरांच्या बाजूने मोहिते पाटील कुटुंब व करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे होते. आता मोहिते पाटील यांच्या विरुद्ध निंबाळकर यांच्यात लढत होत असून गेल्यावेळी विरोधात असलेले शिंदे हे निंबाळकरांच्या बाजूने आहेत तर मोहिते पाटील हे विरोधात आहेत. निंबाळकर यांच्या बाजूने करमाळ्याचे आमदार शिंदे, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, माणचे आमदार जयकुमार गोरे, माळशिरसचे आमदार राम सातपुते हे आहेत. तर मोहिते पाटील यांच्या बाजूने करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे आहेत. मोहिते पाटील यांच्या विरोधातील माळशिरसचे उत्तमराव जानकर हे काय भुमीका घेतील हे पहावे लागणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सध्या कोणालाही एकतर्फी आहे असे वाटत नाही. अत्यंत अटीतटीचा सामना होण्याचे चिन्ह येथे आहे. आमदार शिंदे हे निंबाळकर यांना मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर त्यांचे विरोधक माजी आमदार पाटील हे मोहिते पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मतदानापर्यंत सध्याच्या वातावरणात बदल झाला नाही तर येथे चित्र वेगळे दिसेल. गेल्या निवडणुकीत बागल गट आमदार शिंदे यांच्याबरोबर होता. त्यानंतर रश्मी बागल विधानसभा निवडणुकीत उतरल्या. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. आता त्या भाजपात आहेत.