करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील चिखलठाण भागात महत्वाचा समजला जाणारा कुगाव ते चिखलठाण या रस्त्याचे आज (सोमवारी) आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अतिशय वेगात हे काम होणार असल्याने आणि वेगळीच मशीनरी येथे आली असल्याने या कामाची जोरदार चर्चा जशी सुरु आहे, तशीच आमदार शिंदे यांचा पाटील गटाचे नेते धुळाभाऊ कोकरे यांनी केलेल्या सत्काराचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

सोमवारी सकाळी १० वाजताची कार्यक्रमाची वेळ होती. नेहमी प्रमाणे हा कार्यक्रम उशीरा सुरु होईल अशी शक्यता होती. मात्र ठरल्या वेळात आमदार शिंदे हे कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर झाले. पत्रकार देखील तेव्हा उपस्थित नव्हते. आमदार शिंदे यांचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या निवासस्थानी पुष्पवृष्टी करत व फटाक्याची आतिषबाजी आणि हलगीच्या कडकडाटात जोरदार स्वागत झाले. त्यानंतर रस्त्याचे भूमिपूजन व फलकाचे अनावरण झाले.

आमदार शिंदे यांचे स्वागत आणि त्यानंतर मनोगत असा कार्यक्रम झाला. मात्र अत्याधुनिक मशीन कशा आहेत आणि त्याचे काम कसे केले जाते याचे प्रात्यक्षिक आमदार शिंदे यांनी स्वतः शेतात मंडी घालून सर्वांसमवेत खाली बसून पाहिले. १०० मीटर काम झाल्यानंतर आणि सर्व काम सुरळीत झाल्यानंतर आमदार शिंदे यांचे समर्थकांकडून स्वागत झाले. या कामाची आणि मशीनची सर्वांमध्ये चर्चा सुरु होती. कारण अतिशय वेगाने काम करणारी ही मशीनरी सर्वजण पहिल्यादाच पहात होते. ही चर्चा सुरु असतानाच राजकीय घडामोड देखील घडली आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर वर्तुळात चर्चा रंगू लागली ती विधानसभेच्या तोंडावर माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाला फटका बसतो की काय याची!

कारण करमाळा तालुक्याच्या दृष्टीने चिखलठाण, कुगाव, शेटफळ ही गावे राजकीय दृष्ट्या महत्वाची आहेत. रस्त्याच्या प्रश्नामुळे आमदार शिंदे यांना लक्ष केले जात होते. मात्र अत्याधुनिक मशनरीच्या माध्यमातून काम करून दाखवत या भागातील नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला आहे. आणि त्यात ते यशस्वीही झाले आहेत, असे तेथील वातावरणावरून जाणवत होते. हे करत असतानाच आमदार शिंदे यांनी दुसराही डाव साधला तो म्हणजे धुळाभाऊ कोकरे यांचा!

चिखलठाण येथील आमदार शिंदे यांचे समर्थक आणि दोघांचेही एकमेकांचे विरोधक राजेंद्र बारकुंड व माजी सरपंच चंद्रकांत सरडे यांना एका मंचावर आणले आणि एकमेकांचेही त्यांनी कौतुकही केले. सरडे यांच्या घरी आमदार शिंदे हे स्नेहभोजनासाठी गेले तेव्हा तेथे कोकरे आले आणि आमदार शिंदे यांचा वाढदिवस आणि रस्त्याचे काम सुरु केल्यामुळे स्वागत केले. याचे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर ‘काय सांगता’ने कोकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

कोकरे यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली असून नेमके पुढे काय होणार हे पहावे लागणार आहे. मात्र यापूर्वीही कोकरे आणि आमदार शिंदे यांची भेट झाली होती, असे बोलले जात आहेत. आमदार शिंदे यांच्या समर्थकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यात कोकरेंसारखा वजनदार नेता शिंदे गटात आला तर त्याचा फायदाच होणार आहे. मात्र येणाऱ्या काळात कशी सूत्रे हलतात त्यावर हे अवलंबून आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *