करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्याच्या राजकारणात प्रमुख गटापैकी असलेला बागल गट विधानसभा निवडणुकीपासून सावरत असतानाच धाराशिव जनता सहकारी बँकमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यात या बँकेच्या पथकामुळे तहसील परिसरात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. थकीत कर्ज वसुलीप्रकरणात या बँकेने मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई केली. मात्र करमाळ्यातील मालमत्ता ताब्यात घेताना ‘सीएमओ’चा (मुख्यमंत्री कार्यालय) फोन आल्याने पुढील कारवाही टळली, अशी चर्चा आहे. न्यायालयीन प्रकरण असल्याचे सांगत कारवाईसाठी मोठा फॊज फाटा घेऊन आलेल्या या बँकेच्या अधिकाऱ्यांचीही आता भाषा बदलली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बागल गटाने कारखान्यासाठी कामोणे, कोर्टी व करमाळा येथील मालमत्ता तारण ठेऊन धाराशिव जनता सहकारी बँकेकडून कर्ज काढले होते. मात्र वेळेत कर्ज परतफेड झाले नसल्याने बँकेने कायदेशीर कारवाई सुरु केली होती. महसूल प्रशासनाकडे तारण मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली होती. त्यातील काही मालमत्ता बँकेने ताब्यातही घेतली होती. करमाळ्यातील मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी काही तांत्रिक अडचण आली होती. दरम्यान बँक अधिकाऱ्यांना सीएमओचा फोन आला. त्यामुळे मोठा फॊजफाटा घेऊन आलेले अधिकारी परतले होते. यानिमित्ताने राजकीय हेतूने तर ही कारवाई नव्हतीना? असा प्रश्न वर्तविला जात आहे.
बँक अधिकारी यावर मात्र काहीच बोलायला तयार नाहीत. न्यायालयीन प्रकरण असल्याचे सांगत माध्यमांशी बोलणे टाळत आहेत. याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेळ्या चर्चा आहेत. बागल यांनी काही रक्कम भरण्याचे जाहीर केले असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. बँकेने सुरु केलेली ही कारवाई पुढे चालू आहे की नाही याबाबत मात्र अधिकृत समजलेले नाही. पण याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.